होप हॉस्पिटलच्या डॉक्टरकडे 12 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, सरोदेंसह 7 जणांवर गुन्हा
नागपुरात रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पांचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांना निलंबित करण्यात आले.
नागपुरातील टेकानाका परिसरात असलेल्या होप हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर आणि हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा आरोप करून बदनामी करण्याची आणि परवाना रद्द करायला लावण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पांचपावली पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे (45), महिला प्रमुख मनीषा पापडकर (40), उपजिल्हाप्रमुख पंकज खिंची (40), मुल्ला सिंह गौर, प्रतीक बहुगुणा (40), महेश ढोले (40) आणि शुभम साठे (25) यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
होप हॉस्पिटल आणि रामदासपेठेतील आयुष्मान हॉस्पिटल या दोन्हींचे संचालक डॉ. मुरली बालसुंदरम कसियामल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला गेला. डॉ. मुरली टेकानाका येथे होप हॉस्पिटल आणि रामदासपेठ येथे आयुष्मान हॉस्पिटल चालवतात. होप हॉस्पिटलमध्ये विविध सरकारी योजनांखाली रुग्णांवर उपचार केले जातात.
गेल्या 30 ऑगस्टला वर्धा येथील रहिवासी विठ्ठल तुकाराम साठे या रुग्णाला उपचारासाठी आयुष्मान हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. उपचारासाठी पैसे नाहीत, असे नातेवाईकांनी सांगितल्यावर साठे यांना होप हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्या सगळ्या शरीरात गँगरीनचे इन्फेक्शन पसरले होते. प्राथमिक तपासणी आणि बाहेरून आणाव्या लागणाऱ्या औषधांसाठी त्यांच्याकडून 30,000 रुपये घेण्यात आले.
इन्फेक्शन पसरल्यामुळे साठे यांचे पाय कापावे लागतील, हे डॉक्टरांनी नातेवाईकांना आधीच सांगितले होते. मात्र नातेवाईकांनी त्याला परवानगी दिली नाही. उपचार सुरू असताना 5 सप्टेंबरला साठे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी नातेवाईकांना मृतदेह घेऊन जायला सांगितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर साठे यांचे नातेवाईक आणि शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी काही मीडियाकर्मींना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले.
तिथे गोंधळ झाल्यावर हॉस्पिटल व्यवस्थापनाने कंट्रोल रूमला कळवले आणि पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. याच दरम्यान शरद सरोदे यांनी डॉ. मुरली यांना धमकावले, असा तक्रारीत आरोप आहे. हॉस्पिटलची बदनामी करण्याची आणि परवाना रद्द करायला लावण्याची धमकी देऊन स्वतःसाठी 10 लाख आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपये मागितल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी ऑडिओ रेकॉर्डिंगसह पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी खंडणी वसुलीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील आरोपांमुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पांचपावलीचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांना निलंबित केले आहे. घटनेनंतर 2 ते 3 दिवसांतच डॉ. मुरली यांनी शरद सरोदे यांनी ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. पण लेखी तक्रार द्यायला किंवा स्वतः फिर्याद नोंदवायला होप हॉस्पिटलकडून कोणीही पोलीस स्टेशनला गेले नाही. त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित राहिले होते.
बुधवारी पोलीस आयुक्तांनी शहरातील डॉक्टरांसोबत बैठक घेतली. त्यात डॉक्टरांची सुरक्षा निश्चित करण्यावर चर्चा झाली. याच वेळी पीआय पुरी यांनी एफआयआर नोंदवला नाही, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने पुरी यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिले. मात्र विभागातील अधिकारी सांगतात की, तक्रार देण्यासाठी डॉ. मुरली किंवा त्यांच्या वकिलांना अनेकदा पोलीस स्टेशनला यायला सांगण्यात आले होते. पण त्यांच्याकडून अधिकृतपणे तक्रार बुधवारीच नोंदवण्यात आली. पुरी यांच्या निलंबनामुळे शहरातील अधिकाऱ्यांमध्येही नाराजी आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.