गूळ आणि फुटाणे रोज खाल्ल्यास पोट आणि आतडे राहतील निरोगी
रोजच्या धावपळीत बाहेरचे तिखट-तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आणि आतड्यांचे अनेक त्रास वाढतात. त्यावर घरगुती उपाय म्हणून गूळ आणि भाजलेले फुटाणे यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाच्या रगाड्यात स्वतःचं जेवण बनवायला वेळच मिळत नाही, अशी तक्रार आजकाल बहुतेकांची असते. मग बाहेरून आणलेले तयार पदार्थ खाण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण असे तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ सतत आणि जास्त प्रमाणात खाल्ले गेले, तर त्याचा थेट परिणाम पोटावर आणि पचनसंस्थेवर होतो. पोटावरची चरबी वाढते, पचन बिघडते, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो आणि कोलेस्ट्रॉलही वाढू लागतो.
सुरुवातीला हे त्रास किरकोळ वाटतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हळूहळू हीच लहान लक्षणं मोठं रूप घेतात आणि शरीराला धोकादायक ठरतात. आतड्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे अपचन होणं, आंबट ढेकर येणं, कधी कधी मळमळ आणि उलटीसारखं वाटणं असे त्रास सुरू होतात. यावर उतारा म्हणून रोजच्या आहारात गूळ आणि भाजलेले फुटाणे यांचा समावेश केला जावा, असं सांगितलं जातं. या दोन साध्या पदार्थांमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
विकतचे तेलकट-तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरातल्या पौष्टिक गोष्टी आहारात असाव्यात. संध्याकाळी किंवा दुपारी हलकीशी भूक लागली की गूळ आणि फुटाणे खाणं फायद्याचं ठरतं. आयुर्वेदातही या दोन्ही पारंपरिक पदार्थांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. मात्र हे पदार्थ फायदेशीर असले, तरी योग्य प्रमाणातच खावेत, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
भाजलेल्या फुटाण्यांमध्ये प्रथिनं, फायबर, लोह यांसारखी पोषकतत्त्वं भरपूर असतात. यामुळे पोट लवकर भरल्यासारखं वाटतं आणि इतर पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. साखरेच्या तुलनेत गूळ शरीरासाठी जास्त गुणकारी मानला जातो, त्यामुळे मधुमेह असलेले रुग्ण साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकतात असं सांगितलं जातं.
रक्तातील साखर वाढल्यावर अनेकजण गोड पदार्थ पूर्णपणे बंद करतात. पण तसं न करता आहारात गुळाचा वापर करावा, असा सल्ला दिला जातो. गूळ आणि मूठभर फुटाणे खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि साखरेची पातळी संतुलित राहायला मदत होते, असं म्हटलं जातं. वजन कमी करताना फुटाण्यांचा आहारात समावेश केला जातो. मात्र फुटाणे आणि गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण वाढू शकतं.
फुटाण्यांमधल्या फायबरमुळे आतड्यांमधली घाण बाहेर पडायला मदत होते, तर गुळामुळे शरीराला लोह मिळतं. यामुळे पचनसंस्था निरोगी राहायला मदत होते असं सांगितलं जातं. यासोबतच आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळं आणि भरपूर पाणी यांचाही समावेश असणं तितकंच गरजेचं आहे.
ही माहिती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी आहे, यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.