गोवा विमानतळावर आयआयटी भरती परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या दोन संशयितांना अटक
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने कॉपी करणाऱ्या दोघांना पकडले. गोवा आयआयटीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी स्पर्धा परीक्षेत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने कॉपी करणाऱ्या दोघा संशयितांना पकडले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. गोवा आयआयटीमध्ये बिगरशैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय सहायक पदासाठी भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत दोघांनी गैरप्रकार केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे.
पकडलेले दोघेही हरियाणातील जिंद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राकेश डाहोलिया (२९) आणि अंकित सिंह (२३) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी एकाने दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचे समोर आले आहे, तसा संशयही व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.२५ वाजता गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात चढण्यासाठी एका प्रवाशाने सुरक्षातपासणी केंद्रावर आपली बॅग एक्स-रे तपासणीसाठी ठेवली. त्यावेळी सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला बॅगेत संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू दिसल्या. त्यामुळे बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली.
या तपासणीत परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरली जाणारी ३ अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, २ सिमकार्ड आणि ३ ब्लूटूथ इअरपीस सापडले. त्याचबरोबर गोवा आयआयटीच्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्रही मिळाले.
चौकशीत या प्रवाशाने ही उपकरणे परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरल्याची कबुली दिली. त्याच्यासोबत प्रवास करणारा दुसरा साथीदार विमानात बसला असल्याची माहितीही त्याने सीआयएसएफला दिली. त्यानंतर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या प्रवाशाची ओळख पटवण्यात आली आणि त्याला विमानातून खाली उतरवण्यात आले. त्याच्या बॅगेतही अशाच प्रकारची उपकरणे आणि सिमकार्ड सापडले.
दोघांना पुढील तपासासाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका आरोपीने दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचा दावा केला आहे. सुरक्षा तपासणीच्या प्रतीक्षालयात त्याने फेकून दिलेली इतर व्यक्तीची ओळखपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. आपण संरक्षण आस्थापनात कर्मचारी असल्याचा या दोघांचा दावा आहे आणि त्याचीही पडताळणी केली जात आहे.