मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:33 IST

गोंडवाना महाखंडाने पृथ्वीचा 80 टक्के भाग व्यापला होता; एआयच्या मदतीने नवा शोध

25 हजार प्राचीन खडकांच्या अभ्यासातून आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञांनी गोंडवाना या प्राचीन महाखंडाबद्दल नवी माहिती समोर आणली आहे.

गोंडवाना महाखंडाने पृथ्वीचा 80 टक्के भाग व्यापला होता; एआयच्या मदतीने नवा शोध छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या भूगर्भीय इतिहासात अनेक मोठमोठे महाखंड तयार झाले आणि पुढे काळाच्या ओघात ते विखुरले गेले. यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा आणि विस्तीर्ण भूभाग म्हणजे गोंडवाना. भारतीय उपखंड, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सगळे देश एकेकाळी याच गोंडवानाचा भाग होते. सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात शास्त्रज्ञांनी गोंडवानाच्या रचनेबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांना गोंडवानाच्या प्राचीन सीमांचे महत्त्वाचे अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांचं असं मत होतं की गोंडवानाने त्या काळातल्या पृथ्वीच्या भूभागापैकी फक्त दोन-तृतीयांश म्हणजे साधारण 65 टक्के भाग व्यापला होता. पण नव्या संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की 80 ते 50 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या गोंडवाना महाखंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी तब्बल 80 टक्के भाग व्यापला होता.

हा शोध डीप-टाइम डिजिटल अर्थ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक गटाने लावला आहे. चायनीज अकॅडमी ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसचे प्राध्यापक ताओ वांग आणि कर्टीन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक विल्यम कॉलिन्स यांच्या नेतृत्वाखालील टीमने जगभरातून 25 हजारांहून अधिक प्राचीन मॅग्मॅटिक खडकांचे नमुने गोळा केले. भूगर्भीय हालचालींमुळे लाखो-करोडो वर्षांत गोंडवानाचे तुकडे जगभरातल्या वेगवेगळ्या खंडांत आणि पर्वतांमध्ये विखुरले गेले होते. हे खडक नेमके केव्हा आणि कशा परिस्थितीत तयार झाले, हे शोधण्यासाठी संशोधकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि प्रगत डेटाबेस तंत्रज्ञान वापरलं. एआयच्या मदतीने या खडकांची मूळ स्थानं निश्चित करण्यात आली आणि प्राचीन पृथ्वीचा एक डिजिटल नकाशा तयार करण्यात आला.

गोंडवानाचा हा नकाशा शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी सॅमॅरियम आणि निओडिमियम या मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा वापर केला. हे आयसोटोप्स गोंडवानाच्या मूळ खडकांची एक प्रकारची रासायनिक स्वाक्षरी किंवा फिंगरप्रिंट म्हणून काम करतात. या संशोधनातले प्रमुख लेखक कॉलिन्स यांनी या सॅमॅरियम-निओडिमियम आयसोटोपिक नकाशाला भूतकाळात घेऊन जाणारं टाईम मशीन असं म्हटलं आहे. फक्त 20 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेल्या नव्या पर्वतांमध्ये लपलेले 50 कोटी वर्षांपूर्वीचे प्राचीन खडक ओळखणं या फिंगरप्रिंट तंत्रज्ञानामुळे शक्य झालं.

या शोधातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गोंडवानाची निर्मिती आणि पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा विकास यांच्यातला थेट संबंध. साधारण 53.8 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कँब्रियन स्फोट झाला होता, ज्या काळात पृथ्वीवर अचानक वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या आणि मोठ्या जीवांचा उदय झाला. त्याआधी अब्जावधी वर्षं पृथ्वीवर फक्त साधे सूक्ष्मजीव होते.

गोंडवाना महाखंड तयार होत असताना पृथ्वीच्या परिघाच्या साधारण 79 टक्के भागात प्रचंड भूगर्भीय हालचाली झाल्या आणि एक प्राचीन रिंग ऑफ फायर म्हणजे अग्नीचं वलय तयार झालं. या रिंग ऑफ फायरमधल्या ज्वालामुखींच्या सततच्या उद्रेकांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ यांसारखे वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. यामुळे अतिथंड असलेली पृथ्वी उबदार झाली आणि या हवामान बदलामुळेच पृथ्वीवर गुंतागुंतीची जीवसृष्टी बहरण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ