गोंदियात 61 वर्षीय वृद्धाचा विटेने खून; 21 वर्षीय आरोपी 12 तासांत पोलिसांच्या जाळ्यात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आमगाव हद्दीतील बोथली गावात जमीन व्यवहारातील 4 लाख रुपयांच्या दबावातून खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले असून स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांत आरोपीला पकडले.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोथली गावात एका 61 वर्षीय वृद्धाचा विटेचे वार करून खून झाला. गावातीलच 21 वर्षीय अजय शामराव ब्राह्मणकर या प्रॉपर्टी दलालाला या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. मृताचे नाव चंद्रशेखर भास्कर दहीकर असून गावात त्यांना सगळे गुरुजी म्हणत. जमीन व्यवहारात अडकलेले 4 लाख रुपये परत करण्याच्या दबावातून आरोपीने हे कृत्य केले, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने अवघ्या 12 तासांत या खुनाचा उलगडा केला. मृतदेह झुडपात लपवण्यात आला होता, तरीही आरोपी पोलिसांच्या हातून सुटू शकला नाही.
पोलीस तपासात समोर आलेली हकीकत अशी की, चंद्रशेखर दहीकर एकटेच राहत होते. सप्टेंबर 2026 मध्ये त्यांनी आपली जमीन विकण्यासाठी गावातील प्रॉपर्टी दलाल अजय ब्राह्मणकर याला मध्यस्थ नेमले होते. खरेदीदाराकडून 5 लाख रुपये टोकन मनी मिळाली. त्यातील 4 लाख रुपये विश्वासाने अजयच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते.
जमिनीच्या कागदपत्रांमधील त्रुटींमुळे रजिस्ट्री होऊ शकली नाही आणि खरेदीदाराशी व्यवहार मोडला. ठरलेल्या अटींनुसार खरेदीदाराला 27 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत रक्कम परत करायची होती. दहीकर गुरुजी अजयकडे सतत आपल्या 4 लाख रुपयांची मागणी करत होते. दरम्यान, अजयने त्या पैशांतून शेअर बाजारात इंट्राडे ट्रेडिंग केली आणि त्यात सुमारे साडेतीन लाख रुपये गमावले, असे पोलिसांच्या तपासात पुढे आले.
बँक खाते रिकामे झाले होते आणि पैसे परत करण्याची मुदत जवळ येत होती. या दबावातून सुटण्यासाठी 21 वर्षीय अजयने वृद्धालाच संपवण्याचा कट रचला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 26 ऑक्टोबरच्या रात्री सुमारे 10 वाजता दहीकर गुरुजी गावातून पायी घरी परतत होते. तेव्हा आरोपी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसला होता. ते जवळ येताच त्याने जड वीट उचलून त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले. गंभीर जखमी झालेल्या गुरुजींचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह घरासमोरच्या झुडपात ओढत नेऊन टाकला आणि तो पळून गेला.
27 ऑक्टोबरच्या सकाळी सुमारे 11.30 वाजता बोथलीच्या शेतशिवारातील झुडपांमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह सापडला आणि परिसरात खळबळ उडाली. जवरी गावातील रहिवासी पोलीस पाटील शकुंतला पाथोडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कामाला लावले. LCB चे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावातील संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचे धागे जोडले. काही तासांतच संशयाची सुई अजयकडे वळली. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सगळी हकीकत सांगितली, असे पोलिसांनी सांगितले.
या खुनाचा 12 तासांत छडा लावण्यात LCB चे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, एपीआय अमरदीप खाडे, एएसआय राजू मिश्रा, सायबर सेलचे एपीआय देवीदास ठमके यांच्यासह गुन्हे शाखा आणि सायबर सेलमधील 20 पेक्षा जास्त जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.