जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपार खुनाचा २४ तासांत उलगडा, दोघांसह दोन विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी भागात रात्रपाळीच्या कामासाठी निघालेल्या एका वृद्ध व्यक्तीची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत छडा लावला. तपासात जादूटोण्याच्या संशयातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. गावातील चर्चेच्या धाग्यावरून पोलिसांनी तपास पुढे नेला आणि त्यातूनच संशयितांपर्यंत पोहोचता आले.
रविशंकर (५८, रा. मुंडीपार) हे रविवारी रात्री रात्रपाळीच्या कामासाठी दुचाकीवरून व्यंकटेश राईस मिल, एमआयडीसी मुंडीपार येथे निघाले होते. चमडा फॅक्टरीजवळील रस्त्यावर रात्री ७.४५ ते ८.१५ या वेळेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून केला. रविशंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विक्की रविशंकर रहांगडाले (३१, रा. मुंडीपार) यांनी गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यावरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गावात अशी चर्चा असल्याची माहिती मिळाली, की मृत रविशंकर हे जादूटोणा करतात. या कारणावरून गावातील काही जणांचा त्यांच्यावर राग असल्याचेही तपासात पुढे आले. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी कमलेश अशोक नेवारे (१९, रा. टॉवरटोली, मुंडीपार) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत कमलेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू आणि घरातील सदस्यांची वारंवार ढासळणारी तब्येत यामागे रविशंकर यांनी केलेला जादूटोणा कारणीभूत असल्याचा त्याचा समज होता. तपासात असेही समोर आले की, गावातील इतर काही कुटुंबांतील मृत्यू आणि आजारपणासाठीही रविशंकर यांना जबाबदार धरले जात होते. याच समजातून त्यांच्याबद्दल गावात राग आणि संशय वाढत गेल्याचे तपासात पुढे आले.
याच संशयातून कमलेश, जितेंद्र कोहळे (४५, रा. टॉवरटोली, मुंडीपार) आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी रविशंकर यांचा खून करण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. रविवारी सायंकाळी आरोपींनी रविशंकर यांचा पाठलाग करून कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाची उकल गावातील चर्चेच्या आधारे अवघ्या २४ तासांत केली.
या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत जितेंद्र कोहळे आणि कमलेश अशोक नेवारे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबतच या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.