गणेश विसर्जनासाठी साताऱ्यात तीन दिवस वाहतूक बदल, अनेक रस्ते बंद राहणार
पोलिसांनी गुरुवार ते शनिवार या काळात मुख्य रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. पोलिसांनी यासाठी तब्बल तीन दिवसांचे वाहतूक नियोजन तयार केले असून गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वाहनांची गर्दी होऊ नये आणि भाविकांना सुरक्षितपणे मिरवणूक बघता यावी, हा यामागचा उद्देश आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ नुसार याबाबतची अधिसूचना काढली आहे. यामध्ये राजपथ, मोती चौक, शनिवार चौक, राधिका टॉकीज चौक, बुधवार नाका तसेच विसर्जनाच्या कृत्रिम तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
राजपथ परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक तसेच कमानी हौद ते शेटे चौक या मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यामध्ये शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक ते राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका आणि विसर्जन कृत्रिम तलाव या मार्गाचा समावेश आहे. प्रतापगंज पेठेतही निर्बंध असणार असून काटदरे मसाले दुकान ते डीसीसी बँक, मोती तळे या मार्गावर वाहनांना जाता येणार नाही. शाहूपुरीकडेही शाहूपुरी पोलीस स्टेशन ते बुधवार नाका या रस्त्यावर वाहतूक बंद राहील. समर्थ मंदिर ते चांदणी चौक आणि बोगदा-समर्थ मंदिर-शाहू चौक या मार्गांवर हलक्या व अवजड वाहनांसह एसटी बसच्या वाहतुकीवरही निर्बंध असतील.
सज्जनगड आणि कास पठाराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केला आहे. ही वाहने गोडोली नाका, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी, शेंद्रे-सोनगाव फाटा आणि बोगदा या मार्गाने वळवली जाणार आहेत. तर मोळाचा ओढा येथून सातारा शहरात येणारी वाहने महानुभाव मठ, करंजे, भूविकास बँक चौक या मार्गाने पुढे सोडली जातील.
विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास पूर्ण बंदी असणार आहे. मिरवणूक बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी तालीम संघ मैदान, कोटेश्वर मैदान किंवा उपलब्ध असलेल्या पर्यायी पार्किंगच्या जागी वाहने लावावीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना मात्र हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
नागरिकांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. २४ सप्टेंबर सकाळी १० नंतर शहरात येताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, विसर्जन मार्गावर वाहन पार्क करू नये, मिरवणुकीच्या काळात शक्यतो सार्वजनिक वाहतूक किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.