गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील 17 रस्ते बंद, वाहतुकीत मोठे बदल
पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक बंदी आणि नो-पार्किंगचे नियोजन जाहीर केले आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल जाहीर केले आहेत. 25 सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील 17 मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. ही बंदी 24 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून सुरू होऊन मुख्य मिरवणूक संपेपर्यंत लागू राहील. प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे.
भाविकांची गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी अनेक भागांत नो-पार्किंग, वाहतूक वळवण्याची व्यवस्था आणि रिंगरोडचे नियोजन केले आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियोजन पाहूनच बाहेर पडावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
बंद राहणाऱ्या 17 रस्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता आणि गुरुनानक रस्ता यांचा समावेश आहे.
गरज पडल्यास जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील अपोलो टॉकीज-दारूवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील सावरकर पुतळा चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौक या ठिकाणांहून वाहतूक वळवली जाईल. नागरिकांसाठी कर्वे रस्ता ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक, आंबेडकर रस्ता ते गुलटेकडी-मार्केटयार्ड जंक्शन, सातारा रस्त्याने व्होल्गा चौक आणि सिंहगड रस्त्याने म्हात्रे पूल ते नळस्टॉप असे पर्यायी रिंगरोड मार्गही सुचवण्यात आले आहेत.
गुरुवार, 24 तारखेच्या रात्री 11 वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (FC रस्ता) या मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना पार्किंगची कडक मनाई असेल. पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि MSEB ची वाहने याला अपवाद असतील. खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या सुमारे 100 मीटर परिसरातही पार्किंग पूर्णपणे बंद राहील.
शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल 48 तास, पुणे शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. जड वाहनचालकांनी शहराबाहेरील वळण मार्गांचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
धायरी आणि सिंहगड रस्ता भागात धायरी फाटा चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील, तर स्वारगेटकडून येणारी वाहतूक धायरी उड्डाणपूल, राजयोग सोसायटी चौक, नांदेड सिटी चौक आणि कॅनॉल पूल मार्गे वळवली जाईल. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहील. केशवनगर व मुंढवा भागातही छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गायरानवस्ती परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने शहरातील 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, शिवाजी आखाडा वाहनतळ, फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज, पेशवे पार्क सारसबाग आणि BMCC मैदान यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. सर्वत्र दुचाकी पार्किंगची सोय असून काही ठिकाणे खास चारचाकी वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.