नागपुरात गडकरींची नेत्यांना कोपरखळी; गावात ओनरशिप घेऊन ठोस काम करण्याचे आवाहन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील कार्यक्रमात राजकीय नेत्यांच्या वागणुकीवर मिश्किल भाष्य केले आणि भारत जागतिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने जात असल्याचा विश्वास व्यक्त केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना राजकारणातल्या नेत्यांना आपल्या नेहमीच्या खास शैलीत टोला लगावला. राजकारणातले काही नेते कसे वागतात, यावर त्यांनी मिश्किल शब्दांत बोट ठेवले. ते म्हणाले, "आमच्याकडे राजकारणात हुशार नेते असतात. बोटाने मलम लावण्याचं काम ते करतात."
या नेत्यांच्या वागण्याचे वर्णन करताना गडकरी म्हणाले, "कडक कपडे घालतात, कार्यक्रमाच्या मंचावर येऊन बसतात, इम्प्रेशन मारण्याचाही प्रयत्न करतात. मात्र नेते गेले की पळून जातात. असे चतुर लोक खूप आहेत. त्यांची चतुराई लक्षात येते, पण त्यांच्यात ओनरशिप नसते. मात्र, दुर्दैवाने राजकारणात हे सगळं चालून जात असतं."
राजकारण्यांच्या मानसिकतेवरही गडकरींनी भाष्य केले. त्यासाठी त्यांनी महादेवाच्या मंदिरात दूध अर्पण करण्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "पाऊस पडावा म्हणून महादेवाच्या मंदिरात सर्वांनाच दूध टाकायला सांगितलं, तर राजकारणातील लोक पाणी टाकतील, दुधाचा थेंबही दिसणार नाही. कारण साहेबांनी सांगितलं तर सारं गाव दूध टाकणारच आहे, मग आपलं दूध कशाला संपवावं, असा विचार ते करतात." अशा शब्दांत त्यांनी राजकीय नेत्यांना कोपरखळी मारली.
गडकरींनी नेत्यांना जबाबदारी घेण्याचेही आवाहन केले. "शेवटी काही फलनिष्पत्ती तर झाली पाहिजे. नुसतं सौम्य होऊन उपयोग नाही," असे ते म्हणाले. आपण सर्वांनी ओनरशिप घेतली पाहिजे, आपल्या गावात आणि मतदारसंघात येऊन मी चित्र बदलेन, अशी भूमिका घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नेत्यांनी केवळ मिरवण्यापेक्षा आपल्या गावात आणि मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी ठोस काम उभे करावे, असा संदेश त्यांनी दिला.
देशाच्या प्रगतीबद्दलही गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेल्या गडकरींनी सांगितले की भारत एक जागतिक आर्थिक शक्ती बनत आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि भविष्यातील विकासासाठी पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न आहे, असेही ते म्हणाले. भारत ज्या गतीने सध्या प्रगती करत आहे, त्यावरून आपण एक जागतिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, याची मला १०० टक्के खात्री आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक शक्ती बनण्यासाठी काय लागते, हेही गडकरींनी उलगडून सांगितले. आज आर्थिक शक्ती बनण्यासाठी आपल्याला उद्योग आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांची गरज आहे, असे ते म्हणाले. जीडीपी वाढीसाठी हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मात्र औद्योगिक आणि कृषी विकासासाठी उत्तम पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. पाणी, वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक अशा मुख्य पायाभूत सुविधा आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.