एसटीची तिकिटे आता व्हॉट्सअॅपवर, बसचे लाईव्ह लोकेशन आणि तक्रारही त्याच चॅटमध्ये
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व्हॉट्सअॅपवरून ई-तिकीट, बस ट्रॅकिंग आणि प्रवासी सेवा सुरू करणार आहे. त्यासाठी आयटी विभागाने अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्याची जीवनरेखा मानली जाणारी लालपरी म्हणजेच एसटी बस आता पूर्णपणे डिजिटल वळणावर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ई-तिकीट, बसचे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि प्रवाशांसाठीच्या इतर सेवा सुरू करणार आहे. प्रवास सोपा, हायटेक आणि सोयीचा करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.
यासाठी महामंडळाच्या आयटी विभागाने अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे. ही सुविधा पुढच्या सहा महिन्यांत प्रत्यक्षात आणण्यावर महामंडळाचा भर आहे. राज्यभरात गावांपासून शहरांपर्यंत रोज लाखो लोक एसटीने प्रवास करतात. त्यापैकी नागपूर विभागातच सुमारे १ लाख प्रवासी रोज एसटीने जातात.
मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांना यासाठी कोणतेही नवे अॅप डाउनलोड करावे लागणार नाही. एसटीच्या व्हाट्सऐप चॅटबॉटवर बस निवडायची, सीट निवडायची, ऑनलाइन पैसे भरायचे आणि ई-तिकीट मिळवायचे, ही सगळी प्रक्रिया काही क्षणांत पूर्ण होईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगने पैसे भरता येतील आणि काही सेकंदांत ई-तिकीट हातात येईल.
स्थानिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा विचार करून ही सुविधा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध असेल. महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन वापरणाऱ्याकडे व्हाट्सऐप आधीच आहे, त्यामुळे गावातला आणि शहरातला प्रवासी सहज तिकीट काढू शकेल.
महामंडळाच्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टमशी ही सेवा जोडलेली असल्याने प्रवाशांना घरबसल्या आपल्या बसचे लाईव्ह लोकेशन, ती कधी येण्याची शक्यता आहे आणि किती सीट रिकाम्या आहेत, हे व्हॉट्सअॅपवरच पाहता येईल.
प्रवासात बसमधली स्वच्छता, उशीर किंवा चालक आणि वाहकाबद्दलची कोणतीही तक्रार व्हॉट्सअॅपवरच नोंदवता येईल. तक्रार नोंदवताच एक युनिक ट्रॅकिंग नंबर मिळेल आणि त्यावरून तक्रारीचे स्टेटस थेट पाहता येईल.
तिकिटाचे मूळ भाडे थेट एसटी महामंडळाच्या खात्यात जमा होईल. प्रवाशांच्या डेटाच्या गोपनीयतेसाठी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम २०२३ अंतर्गत सायबर सुरक्षेचे कडक निकष लागू असतील.
महामंडळाने पुढच्या ५ वर्षांत व्हॉट्सअॅपवरून सुमारे २०.५७ लाखांपेक्षा जास्त तिकिटांचे यशस्वी बुकिंग होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक धोरणात्मक आणि तांत्रिक व्यवस्था केल्या आहेत. बस कुठे पोहोचली आणि कधी येणार ही माहिती फक्त व्हॉट्सअॅपवर मिळणार असल्याने नेहमीचे प्रवासी आपोआप या प्लॅटफॉर्मकडे वळतील, असा महामंडळाला विश्वास आहे. तसेच नेहमीच्या प्रवाशांच्या आवडत्या रूटनुसार त्यांना खास नोटिफिकेशन आणि ऑफरही दिल्या जातील.
एसटीसाठी ऑनलाइन सुविधा आहे, पण व्हॉट्सअॅपवर तिकीट बुकिंगची व्यवस्था आतापर्यंत नाही. महामंडळ आता त्याच प्रकल्पावर काम करत आहे. ही व्यवस्था सुरू झाली की मोठ्या संख्येने प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होईल.
तनुजा कालमेघ, विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.