१३ ऑक्टोबरला ॲपलचा लाँच इव्हेंट? पहिले स्मार्ट होम हब येण्याची शक्यता
एप्पल ऑक्टोबरमध्ये आपले पहिले स्मार्ट होम हब, नवीन HomePod Mini आणि Apple TV 4K आणणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
आतापर्यंत घरातल्या स्मार्ट उपकरणांसाठी आपण Amazon चा Alexa आणि Google चा Home वापरत आलो. आता ॲपलही या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. एका अहवालानुसार, एप्पल ऑक्टोबर महिन्यात आपले पहिले स्मार्ट होम हब बाजारात आणणार आहे. त्याच्यासोबत नवीन HomePod Mini आणि Apple TV 4K हीसुद्धा येतील, असे सांगितले जात आहे.
याची अधिकृत पुष्टी ॲपलने अजून केलेली नाही. अमेरिकेतील ॲपलचे तज्ज्ञ पत्रकार मार्क गुरमन यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबरला ॲपलचा मोठा लाँच इव्हेंट होऊ शकतो. हा इव्हेंट खास स्मार्ट होमसाठी असेल.
या इव्हेंटचे मुख्य आकर्षण ॲपलचे पहिले स्मार्ट होम हब असेल. कंपनीने या होम हबला J490 असे नाव दिले आहे. रिपोर्टनुसार त्याला खाली गोल बेस असेल आणि वर ६ किंवा ७ इंचाचा चौकोनी टचस्क्रीन असेल. तो दिसायला टॅबसारखा असेल आणि टेबलावर ठेवता येईल. त्यात iPhone 16 मध्ये आहे तीच ॲपलची A18 चिप असेल, त्यामुळे हा हब एकदम फास्ट चालेल. या हबवर AI सिरी वापरता येईल आणि FaceTime पण करता येईल. समोर कॅमेराही दिलेला आहे.
हा हब दोन प्रकारांत येईल. एक मॉडेल टेबलावर ठेवायचे असेल आणि त्यात स्पीकर असेल. दुसरे मॉडेल भिंतीवर लावायचे असेल.
पहिला HomePod Mini 2020 मध्ये आला होता. तब्बल सहा वर्षे त्यात कोणतेही अपडेट आले नव्हते. आता २०२६ मध्ये त्याचे अपडेट केलेले व्हर्जन येत आहे. त्यात नवीन चिपसेट आणि सिरी AI चा सपोर्ट असेल, त्यामुळे तो अधिक स्मार्ट होईल. ॲपलने स्वतःची N1 नेटवर्किंग चिप लावल्याने Wi-Fi 7 चा सपोर्ट मिळेल आणि इंटरनेट एकदम फास्ट चालेल. सोबत दुसऱ्या पिढीची Ultra Wideband चिपही असेल.
Apple TV 4K लाही नवीन अपडेट मिळणार आहे. त्यातही नवीन चिप आणि सिरी AI येणार असल्याने टीव्हीचा अनुभव अजून चांगला होईल. या इव्हेंटमध्ये फक्त Mini आणि TV वर फोकस असेल.
जॉन टर्नस यांनी १ सप्टेंबरला ॲपलमध्ये पदभार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील हा दुसरा लाँच इव्हेंट असेल. एकूणच, ॲपलला आता आपले घरही स्मार्ट करायचे आहे. हा हब आला तर Amazon आणि Google ला मोठे टेन्शन येणार आहे. १३ ऑक्टोबरला नक्की काय होते, ते बघावे लागेल.