सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:37 IST

एमपीएससी आंदोलनावरील विधानावरून अतुल लोंढे यांचे जयकुमार गोरेंना आव्हान, माफीची मागणी

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे.

एमपीएससी आंदोलनावरील विधानावरून अतुल लोंढे यांचे जयकुमार गोरेंना आव्हान, माफीची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबई: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी १० दिवस आंदोलन केले आणि त्यामुळे भाजपा महायुती सरकारला झुकावे लागले, पण आता सरकारमधील मंत्री या आंदोलनावर पातळी सोडून टीका करत आहेत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यातील विद्यार्थी आंदोलनावर केलेली टीका हा विद्यार्थ्यांचा घोर अपमान आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर खुले आव्हान दिले आहे. "मंत्री जयकुमार गोरे यांना मी दररोज ३ हजार रुपये देतो, त्यांनी आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत बसावे", असे लोंढे यांनी म्हटले आहे.

गोरे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेताना लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ७० हजार पदे रिक्त असताना सरकार भरती करत नाही, एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडलेले आहे आणि परीक्षा घेतली तर पेपरफुटी होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि तो सरकारला सुधारता येत नाही, असा आरोप लोंढे यांनी केला. विद्यार्थ्यांना १०-१० दिवस आंदोलन करावे लागते, भाजपा सरकारने या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे, असेही ते म्हणाले. कोणी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन केले, तर सरकारला उत्तर द्यावेच लागते, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात राज्यातील गावखेड्यांतून आलेले लाखो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य या गोरगरीब, प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा अपमान आहे, त्यांनी जाहीर माफी मागावी, असे अतुल लोंढे म्हणाले.

लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी आंदोलनामागे परकीय शक्ती आहे, असा जावईशोध गोरे यांनी लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मजबूत?' हातात गेली १३ वर्षे देश आहे, मग परकीय शक्ती पुण्यापर्यंत आल्याच कशा, असा प्रश्न त्यांनी विचारला. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार झोपा काढत आहे का, असेही ते म्हणाले.

कोणत्याही आंदोलनाला बदनाम करणे हीच भाजपाची 'मोडस ऑपरेंडी' आहे, असे लोंढे यांनी म्हटले. शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी म्हटले गेले, विद्यार्थी आंदोलनात परकीय शक्ती असल्याचे सांगितले जाते, जंतर मंतरवरील आंदोलनातही परकीय हात आणि देशद्रोही असल्याचे आरोप केले गेले, अशी उदाहरणे त्यांनी दिली. असे आरोप करून भाजपा स्वतःचे हसे करून घेत आहे, असे ते म्हणाले.

देश सांभाळता येत नाही तर खुर्चीवर बसलात कशाला, असा सवाल करून लोंढे यांनी इशारा दिला की, हेच विद्यार्थी तुम्हाला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ