दुबईहून तेल अवीवला निघालेल्या फ्लायदुबई विमानाचे सौदी अरेबियातील तबूकमध्ये लँडिंग
दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या बोईंग ७३७ विमानातून हायजॅकचा कोड प्रसारित झाला आणि विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर उतरले.
मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण असतानाच एक गंभीर बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई शहरातून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या बोईंग ७३७ विमानातून अपहरणाचा इशारा देणारा संकेत मिळाला. या विमानात सुमारे १५० हून अधिक प्रवासी होते.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान तेल अवीवच्या दिशेने नियमित उड्डाणावर होते. सौदी अरेबियाची हवाई हद्द ओलांडत असताना विमानाने असामान्य हालचाली दाखवायला सुरुवात केली. आधी विमानातून सार्वत्रिक आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारा 'कोड ७७००' (Squawk 7700) पाठवला गेला. त्यानंतर थोड्याच वेळात ट्रान्सपॉन्डरवरून विमानाचे बेकायदेशीर अपहरण किंवा हायजॅकिंग दर्शवणारा 'कोड ७५००' (Squawk 7500) प्रसारित झाला.
हा सांकेतिक कोड मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात (ATC) मोठी घबराट पसरली. लगेचच विमानातील कर्मचाऱ्यांशी संपर्क तुटला आणि ट्रान्सपॉन्डर पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे उड्डाण ट्रॅकिंग रडारवरून हे विमान काही काळ अचानक गायब झाले.
विमानात १५० हून अधिक इस्रायली नागरिक असल्याची माहिती मिळताच इस्रायलमध्ये सुरक्षेचा सर्वोच्च इशारा (High Alert) जारी करण्यात आला. संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायली हवाई दलाने (IAF) आपली लढाऊ विमाने (Fighter Jets) तातडीने हवेत पाठवली. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ (Israel Katz) यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली.
दरम्यान, विमान इस्रायली हवाई हद्दीत शिरण्याआधीच त्याचा मार्ग अचानक बदलला गेला. विमानाने यू-टर्न घेतला आणि ते सौदी अरेबियातील तबूक (Tabuk) विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. वैमानिकाने योग्य वेळी निर्णय घेतल्याने विमान तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
विमान सौदीत सुरक्षित उतरल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी कोड ७५०० का पाठवला गेला, याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. काहींच्या मते कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये अचानक वाद किंवा वैयक्तिक संघर्ष झाला, त्यामुळे हा आपत्कालीन मेसेज गेला असावा. मात्र संबंधित एअरलाइन किंवा सौदी अथवा इस्रायली सुरक्षा यंत्रणांकडून विमानाच्या अपहरणाला अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही.
हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ७५०० आणि ७७०० हे कोड उड्डाणादरम्यान घडलेल्या अत्यंत गंभीर घटनेकडे स्पष्ट निर्देश करतात. सध्या सौदी अरेबियातील अधिकारी आणि फ्लायदुबई एअरलाइन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.