डोंबिवलीत डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, विरोध केल्यास दमदाटीचा आरोप
मानपाडा रोडवरील डी मार्टसमोरील अनधिकृत रिक्षा स्टँडवर प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेतले जात असल्याची तक्रार सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.
डोंबिवलीतील मानपाडा रोडवर असलेल्या डी मार्टच्या मुख्य गेटसमोर एक अनधिकृत रिक्षा स्टँड चालतो, आणि तिथले रिक्षाचालक प्रवाशांकडून ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे उकळत असल्याची तक्रार पुढे आली आहे. कोणी याला विरोध केला तर त्याच्याशी उद्धट वागणूक आणि दमदाटी केली जाते, असा आरोप सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल वि. शेटे यांनी केला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप असून वाहतूक विभाग आणि आरटीओने संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेटे यांनी सांगितलेल्या घटनेनुसार, २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी डी मार्ट ते ९० फूट रोड, कांचनगाव-ठाकुर्ली या मार्गासाठी रिक्षा केली होती. या रस्त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून साधारण १५० रुपये भाडे आकारले जात होते, मात्र यावेळी रिक्षाचालकाने १८० रुपये मागितले. अतिरिक्त ३० रुपये का घेतले जात आहेत असे विचारल्यावर चालकाने उद्धटपणे उत्तर दिले की एवढेच भाडे द्यावे लागेल, नाहीतर जायचे नाही. एवढेच नाही, तर त्या रिक्षाचालकाने परिसरातील इतर चालकांनाही ९० फूट रोड भागात १८० रुपयांपेक्षा कमी भाड्यात कुणालाही घेऊन जाऊ नये असा दम भरल्याचे शेटे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर काही रिक्षाचालक एकत्र येऊन मोठ्या आवाजात बोलू लागले, असेही ते म्हणाले.
डी मार्ट परिसरात ओला किंवा उबर चालक प्रवाशांना घेण्यासाठी आले तर त्यांनाही काही रिक्षाचालकांकडून दमदाटी केली जाते, असा आरोपही शेटे यांनी केला आहे. रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या, अनधिकृत जागी रिक्षा उभी न करण्याच्या, प्रवाशांकडून जास्तीचे भाडे न घेण्याच्या, भाडे नाकारणे टाळण्याच्या आणि प्रवाशांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेटे यांनी संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
डी मार्ट परिसरातील रिक्षाचालकांकडून सुरू असलेला हा प्रकार तातडीने थांबवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि कोळशेवाडी वाहतूक नियंत्रण उपशाखा यांनी या प्रकरणाची चौकशी करून नियमभंग आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही विशाल शेटे यांनी केली आहे.
याबाबत भाजप प्रणित रिक्षाचालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, काही रिक्षाचालक अशा प्रकारे वागत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही युनियन म्हणून अशा लोकांना पाठीशी घालणार नाही. हा विषय आमच्याकडेही आला असून आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.