प्रसूतीनंतर वजन कमी करण्याची घाई नको, आधी पोषक आहाराकडे लक्ष द्या - डॉक्टरांचा सल्ला
प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करण्याच्या घाईत आईच्या शरीराला मिळणाऱ्या पोषणाकडे दुर्लक्ष होते. खराडीच्या मदरहूड हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी यावर आहारविषयक माहिती दिली आहे.
बाळाचा जन्म झाल्यावर घरातलं सगळं लक्ष बाळाच्या दूध पिण्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींकडे वळतं. पण या धावपळीत नुकत्याच बाळंत झालेल्या आईचं जेवण वेळेवर झालं का, तिने पुरेसं पाणी प्यायलं का, तिला निट विश्रांती मिळतेय का, या गोष्टींकडे बरेचदा दुर्लक्ष होतं.
प्रसूतीनंतर आईचं शरीर अजूनही सावरत असतं. त्याचवेळी बाळाला दूध पाजणं, रात्रीची अपुरी झोप आणि सतत काही ना काही काम सुरूच असतं. त्यामुळे या काळात फक्त पोट भरणं किंवा जास्त कॅलरी घेणं पुरेसं नाही, शरीराला हवे ते पोषक घटक मिळणंही तितकंच गरजेचं आहे.
खराडीतल्या मदरहूड हॉस्पिटल्समधील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीथिका शेट्टी यांनी प्रसूतीनंतर आहारात कोणते पदार्थ असावेत, याबद्दल माहिती दिली आहे.
बाळाच्या जन्माचा आनंद घरात असला तरी बाळाची काळजी घेण्याच्या नादात आईच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. दूध पाजणं, बाळाची देखभाल, रात्रीची अपुरी झोप आणि बदललेल्या रुटीनमुळे आईवर शारीरिक आणि मानसिक ताण येतो. प्रसूतीनंतर शरीर गर्भधारणा आणि प्रसूतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत असतं, त्यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
प्रसूतीनंतरचा आहार म्हणजे फक्त जास्त खाणं नाही. शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, प्रथिनं, लोह, कॅल्शियम, चांगले स्निग्ध पदार्थ आणि पुरेसे द्रवपदार्थ मिळणं महत्त्वाचं आहे. आई स्तनपान करत असेल तर तिच्या पोषणाच्या गरजा आणखी वाढतात. त्यामुळे लगेच वजन कमी करण्यापेक्षा शरीर सावरण्यासाठी पुरेसं आणि संतुलित पोषण मिळणं जास्त महत्त्वाचं आहे, असं डॉक्टरांनी नमूद केलं.
प्रसूतीदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावामुळे शरीरातलं लोह कमी होऊ शकतं. गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर शरीरावर आलेल्या ताणामुळे थकवाही जाणवतो. योग्य आहार न मिळाल्यास शरीर पूर्ववत होण्याची प्रक्रिया आणखी अवघड होऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं.
स्तनपान करणाऱ्या आईंना काही पोषक घटक आणि द्रवपदार्थांची जास्त गरज असते. पण बाळाच्या संगोपनाच्या रगाड्यात अनेक आईंचं जेवण वेळेवर होत नाही आणि चहा, बिस्किटं किंवा पॅकेज्ड पदार्थांवरच भूक भागवली जाते. त्याऐवजी पोषक आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
डॉ. शेट्टी यांनी सांगितलेल्या आहारातील घटकांमध्ये हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, मांस, अंडी यासारखे लोहयुक्त पदार्थ; डाळी, अंडी, मासे, चिकन, दूध, दुग्धजन्य पदार्थ, पनीर आणि सोयाबीनमधून मिळणारी प्रथिनं, जी शरीराची झीज भरून काढतात आणि स्नायू पुन्हा बांधण्यास मदत करतात; दूध, दही, पनीर यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि 'ड' जीवनसत्त्व, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करतं; विविध रंगांची फळं आणि भाज्या; ओट्स, गव्हाची पोळी, ब्राऊन राईस यासारखी तृणधान्यं; कडधान्ये, बिया, मासे यातून मिळणारे आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ; आणि पाणी, सूप, दूध यासारखे पुरेसे द्रवपदार्थ यांचा समावेश आहे. 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पूरक औषध घ्यावं, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. तसंच लोहाच्या गोळ्या आधीच सुरू असल्यास त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू ठेवाव्यात, असंही सांगण्यात आलं.
बाळाच्या संगोपनात आई इतकी व्यस्त होते की स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. आधीसारखी शरीरयष्टी कधी मिळणार, वजन कधी कमी होणार, याचा दबावही जाणवतो. पण डॉक्टरांच्या मते हा काळ वजन कमी करण्याची घाई करण्याचा नसून शरीराला सावरण्याचा आणि नव्या रुटीनशी जुळवून घेण्याचा आहे. प्रसूतीनंतर शरीराला पुन्हा ताकद मिळण्यासाठी योग्य आहार आणि पोषण गरजेचं असतं.