मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:00 IST

औषधांच्या गुणवत्तेत तडजोड नको, आरोग्यमंत्री आबिटकरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्देश दिले.

औषधांच्या गुणवत्तेत तडजोड नको, आरोग्यमंत्री आबिटकरांचे अधिकाऱ्यांना निर्देश
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यातील जनतेला दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी औषधांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी 'काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस' या उपकरणाचा प्रभावी वापर करावा, तसेच त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच एसओपीचा अवलंब करून नियमित तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य भवन येथे औषधांच्या गुणवत्ता तपासणीसंदर्भात झालेल्या बैठकीत आबिटकर बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरवठा केल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता पडताळण्यासाठी या उपकरणाच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या उपस्थितीत आधीच मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे राज्यातील आठ परिमंडळांसाठी प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले. उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकाऱ्यांना हे उपकरण कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत देण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक परिमंडळातील जिल्ह्यांसाठी औषध तपासणीचे वेळापत्रक ठरवून प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी केली जाणार आहे. तपासणीची कार्यवाही, त्याचे पालन कसे होते आहे, तपासण्यात आलेल्या औषधांची संख्या आणि तपासणीचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करावा लागणार आहे.

आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान नव्याने प्राप्त झालेल्या औषधांबरोबरच आरोग्य संस्थांमध्ये आधीपासून असलेल्या औषधसाठ्यातील नमुनेही यादृच्छिक पद्धतीने तपासले जातील. प्राथमिक तपासणी, नमुने पुढील तपासणीसाठी पाठवणे, पुष्टीकरण अहवाल आल्यानंतरची कार्यवाही आणि त्याची नोंद ठेवणे यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत.

सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अखत्यारीत येत असल्याने या उपकरणाच्या वापरावर सहसंचालक आणि रुग्णालय स्तरावरील कक्षामार्फत नियंत्रण ठेवले जाईल. संबंधित प्राधिकरण, रुग्णालय यंत्रणा आणि खरेदी यंत्रणेने एकत्र येऊन संयुक्त पथके तयार करावीत आणि तपासणीची कार्यवाही अधिक प्रभावी करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

औषधनिहाय नमुना तपासणी, उपकरण कसे हाताळायचे, तपासणीच्या निकालांचे विश्लेषण आणि त्याची नोंद कशी ठेवायची याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. प्रत्येक विभागात प्रत्यक्ष नमुन्यांवर सराव केल्यास तपासणीतील अचूकता वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी दिलेल्या या उपकरणांचा प्रभावी वापर करून क्षेत्रीय पातळीवरील नियमित तपासणी यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत औषध गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवली जाईल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ