नागपुरात मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्याला जमावाची मारहाण, उपचारांदरम्यान मृत्यू; 8 ते 10 जणांवर गुन्हा
पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या 35 वर्षांच्या नारायणदास वैष्णव यांना जमावाने मारहाण केली. मेयो रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नागपूर जिल्ह्यात बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटीच्या आरोपीचा मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचे प्रकरण अजून शांत झालेही नव्हते, तेवढ्यात पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जमावाच्या मारहाणीची (मॉब लिंचिंग) आणखी एक घटना घडली. नऊ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला लोकांनी पकडले आणि त्याला जबर मारहाण केली. मेयो रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. जमावाचा बळी ठरलेल्या या आरोपीच्या मृत्यूमुळे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मृताचे नाव नारायणदास मनमोहनदास वैष्णव (35) असे सांगण्यात आले आहे. तो मूळचा भिलाईचा रहिवासी असून नोकरीसाठी नागपुरात आला होता. पीडित बालिकेच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नारायणदासविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो ॲक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात त्याचा जबाबही नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात गणपतीचा मंडप उभारलेला होता. सोमवारी रात्री तिथे कार्यक्रम सुरू होता आणि ही मुलगीही इतर मुलांसोबत खेळत होती. जवळच राहणाऱ्या नारायणदासने तिला "तुझ्या आईने थोडा वेळ घरात थांबायला सांगितलंय" असे सांगितले आणि मुलगी त्याच्या बोलण्यात आली, तेव्हा तो तिला आपल्या घरी घेऊन गेला, असा आरोप आहे. तिथे त्याने मुलीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. मुलीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि ती घरातून पळून बाहेर आली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला आणि मंडपाजवळ आधीच अनेक लोक होते, त्यामुळे ही बातमी परिसरात पसरली.
बघता बघता 70 ते 80 लोक तिथे जमा झाले. काही जणांनी नारायणदासला घरातून बाहेर काढले आणि त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव सुरू झाला. मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप असल्याने परिसरातले लोक संतापले होते आणि नारायणदासला बेदम मारले जात होते.
याच दरम्यान पीडित मुलीचे वडील पारडी पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि नारायणदासला लोक मारहाण करत असल्याचेही सांगितले. खबर मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी गेले. तिथली गर्दी पाहून त्यांनी जादा स्टाफ बोलावून घेतला.
पोलीस पोहोचले तेव्हा नारायणदास जखमी अवस्थेत जमिनीवर पडला होता. विचारपूस केल्यावर त्याने गर्दीतल्या 8 ते 10 जणांनी आपल्याला मारल्याचे सांगितले, पण मारहाण करणारे त्या वेळी तिथे नव्हते. तो जखमी असल्याने त्याला उपचारांसाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका हेडकॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून त्याला मारहाण करणाऱ्या 8 ते 10 जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता नारायणदासने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी याही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ठाणेदार नंदा मनगटे यांनी सांगितले की, मारहाणीनंतर नारायणदासला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.