चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडा भेट, अटलांटा प्राणीसंग्रहालयात दोन नवे पाहुणे दाखल
पिंग पिंग आणि फू शुआंग या दोन पांडांनी अटलांटा प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला असून पर्यटकांना त्यांना पाहण्यासाठी क्वारंटाइन कालावधीनंतरच संधी मिळणार आहे.
अमेरिकेतील अटलांटा प्राणीसंग्रहालयात चीनकडून आलेले दोन महाकाय पांडा दाखल झाले आहेत. पिंग पिंग आणि फू शुआंग अशी या दोन पांडांची नावं असून त्यांनी रविवारी अटलांटामध्ये पाऊल ठेवलं. चीन आणि अमेरिका यांच्यात झालेल्या सहकार्य करारानुसार हे दोन्ही पांडा पुढची 10 वर्षं अटलांटा प्राणीसंग्रहालयातच राहणार आहेत. दोघांचाही जन्म 2020 साली चीनमधल्या चेंगदू इथल्या जायंट पांडा प्रजनन संशोधन केंद्रात झाला होता.
यातला पिंग पिंग हा नर पांडा आहे, तर फू शुआंग ही मादी पांडा आहे. चीनपासून अमेरिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास खास बंदोबस्तात पार पडला. या प्रवासासाठी वेगळं विमान वापरण्यात आलं, त्यांच्यासाठी खास पिंजरे तयार करण्यात आले होते आणि वाटेत त्यांना लागणारं अन्न-पाणी यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, प्रवासादरम्यान तज्ज्ञ कर्मचारीही त्यांच्यासोबत होते.
अटलांटा प्राणीसंग्रहालयासाठी हे आगमन खास महत्त्वाचं मानलं जातंय, कारण 2024 साली इथले शेवटचे पांडा चीनला परत गेल्यानंतर काही काळ अटलांटामध्ये एकही पांडा नव्हता. आता पिंग पिंग आणि फू शुआंगच्या रुपाने प्राणीसंग्रहालयात पुन्हा एकदा पांडांचा वावर सुरू झालाय.
दोघांना चेंगदूहून थेट अमेरिकेत आणण्यात आलं. अटलांटा विमानतळावर उतरल्यानंतर खास वाहनांमधून त्यांना प्राणीसंग्रहालयात नेण्यात आलं. प्रवासादरम्यान त्यांच्या तब्येतीची आणि सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेतली गेली.
अटलांटा प्राणीसंग्रहालयाचं चीनसोबतचं पांडा संवर्धन आणि संशोधनातलं नातं बरंच जुनं आहे. याआधीही इथल्या पांडा कुटुंबाने मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित केलं होतं. 1999 पासून अटलांटा आणि चीनमध्ये पांडा संवर्धनाबाबत सहकार्य सुरू आहे आणि या काळात अटलांटा झूमध्ये सात पांडा पिल्लांचा जन्म झाला होता. आताच्या नव्या करारामुळे हे जुनं नातं पुन्हा एकदा ताजं झालंय, आणि त्यामुळे प्राणीसंग्रहालय प्रशासनासोबतच स्थानिक नागरिकांमध्येही उत्साह दिसून येतोय.
पिंग पिंग आणि फू शुआंग जरी झूमध्ये पोहोचले असले, तरी पर्यटकांना त्यांना लगेच बघता येणार नाही. नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि तब्येतीची तपासणी करण्यासाठी दोघांनाही सुमारे एक महिनाभर क्वारंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे. या काळात तज्ज्ञ त्यांच्या खाण्याच्या सवयी, तब्येत, वागणूक आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील. क्वारंटाइन संपल्यावरच त्यांना सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे, त्यामुळे पांडा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांना आणखी काही आठवडे थांबावं लागणार आहे. चीनकडून जगभरातल्या देशांना पांडा पाठवण्याच्या या पद्धतीला 'पांडा डिप्लोमसी' असं म्हटलं जातं. पांडांच्या माध्यमातून चीन इतर देशांशी सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि राजनैतिक संबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. अटलांटाला पांडा पाठवण्याचा हा निर्णयही चीन-अमेरिका सहकार्याच्या याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय. पिंग पिंग आणि फू शुआंगचं आगमन हे केवळ झूसाठीचं आकर्षण नसून जायंट पांडांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचाच एक भाग आहे.