रामपूरच्या जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक, भेगा पडलेल्या भिंतींखाली विद्यार्थी
चिमूर तालुक्यातील रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना भेगा पडल्या असून फरशी उखडली आहे. दुरुस्ती न झाल्याने पालक आणि ग्रामस्थ संतप्त आहेत.
चिमूर तालुक्यातील रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत, इमारतीला तडे गेले आहेत आणि फरशी उखडली आहे. अशा परिस्थितीतच तिथले विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालेला असतानाही इमारतीची ठोस दुरुस्ती अजून झालेली नाही. त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
ही शाळा नेरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. भिंतींना ठिकठिकाणी भेगा आणि तडे गेले आहेत, तर वर्गखोल्यांतील फरशीही उखडली आहे. त्यामुळे मुलांना रोजच असुरक्षित वातावरणात वर्गात बसावे लागत आहे.
इमारतीची दुरवस्था ग्रामपंचायत आणि संबंधित शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. नवीन इमारत बांधावी किंवा आहे त्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी वेळोवेळी अर्ज आणि निवेदने देण्यात आली. तरीही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, म्हणून ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
हा प्रश्न ग्रामसभेतही मांडण्यात आला होता. त्या वेळी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. निवेदने, आश्वासने आणि पाठपुरावा यांच्या पलीकडे प्रश्न सरकलेला नाही, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने फक्त कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
इमारतीची अवस्था चिंताजनक असताना एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करावी आणि ती वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, अशीही मागणी आहे.
पालक आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शाळेची इमारत मुलांच्या भवितव्याशी जोडलेली आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी. गरज असल्यास नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करावा आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी. कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष उपाययोजना व्हाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, आणि या प्रश्नाकडे आता तरी गांभीर्याने पाहिले जाईल का, याकडे रामपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.
याबाबत पंचायत समिती चिमूरचे गटशिक्षणाधिकारी आशीर्वाद सोनपिंपळे यांनी सांगितले, "निर्लेखनासाठी जिल्ह्याला प्रस्ताव पाठविलेला आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ अधिका-यांकडे पाठपुरावा केलेला आहे. पुढील कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून करण्यात येईल."