शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

छठ पूजेसाठी अंबाझरी, फुटाळ्यावर येणाऱ्या भाविकांसाठी मनपा प्रशासन पूर्णपणे सज्ज

PT24 टीम

अंबाझरी तलावाच्या घाटावरील सोयीसुविधांच्या कामाचे भूमिपूजन महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते झाले; बॅरिकेटिंग, प्रकाशव्यवस्था, रुग्णवाहिका यांची तयारी मनपाने केली आहे.

नागपुरात उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव असलेली छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अंबाझरी तलावाच्या घाटावर मोठ्या संख्येने भाविक जमतात आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात. या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ज्या सोयी आणि व्यवस्था करण्यात येणार आहेत, त्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता.०५) महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे आणि नगरसेवक श्री अभिजीत झा उपस्थित होते. उपायुक्त श्री राजेश भगत, सहायक आयुक्त श्री राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारीही हजर होते.

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या, छठ व्रत पूजेमध्ये फक्त उत्तर भारतीय नागरिकच नाही, तर नागपुरातील नागरिकही आस्थेने सहभागी होतात. हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडवणारा उत्सव ठरत आहे. अर्घ्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी तलावावर येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

भाविकांना कसलाही अडथळा होणार नाही, याची पूर्ण काळजी नागपूर महानगरपालिका प्रशासन घेईल, असे त्यांनी सांगितले. भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांसोबतच त्यांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या. तसे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

छठ पूजेच्या दिवशी पहाटे तलावावर भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे आवश्यक तेवढी प्रकाशव्यवस्थाही केली जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली.

छठ पूजेच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा या तलावांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटिंग केले जाईल. संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था असेल. सार्वजनिक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, स्वागत कक्ष आणि श्रद्धाळूंना पूजेसाठी सुरक्षित घाटांचे अस्थायी बांधकाम अशा व्यवस्थाही महानगरपालिका करणार आहे.

छठ पूजा पर्वाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महानगरपालिका निधीचे नियोजन करते. कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी अग्निशमन विभागाची आपत्कालीन यंत्रणा तत्पर राहील. मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रसंगी सर्वश्री आशिष पांडे, सत्येंद्र प्रसाद सिंह, प्रा. बच्चू पांडे, राजेंद्र कुमार पांडेय, संत लाला यादव, नितीश सिंह, केशव निखार, सौरभ झा आणि इतर जण उपस्थित होते.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ