चंद्रपुरात बाल हृदय तपासणी शिबिर, ३१६ पैकी ४८ बालकांच्या हृदयात छिद्र आढळले
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या शिबिरात आढळलेल्या बालकांवर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहेत.
पैशाअभावी कुठल्याही बालकाला हृदयाच्या उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. बालकांचे निरोगी आयुष्य ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि गरजू बालकांच्या उपचारासाठी लागेल ती सगळी मदत मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहणार आहोत, असे ते म्हणाले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत जोरगेवार यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात बाल हृदय आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले. मुंबईतील किम्स रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे सहकार्य त्यासाठी मिळाले. याच वेळी ते बोलत होते.
शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयाचे डॉ. परमानंद आनंदकर, किम्स रुग्णालयाचे डॉ. एल. श्रीनिवास आणि डॉ. सोनिया कारापूरकर उपस्थित होते. भाजपचे महामंत्री रवि गुरुनुले, सविता दंढारे, नामदेव डाहुले, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, विमल कातकर, सुमित बेले, राकेश नाकाडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात एकूण ३१६ बालकांची हृदय तपासणी झाली. त्यापैकी 48 बालकांच्या हृदयात छिद्र असल्याचे तपासणीत दिसून आले. या सर्व बालकांवर मुंबईतील खाजगी रुग्णालयात आवश्यक त्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. मुलाच्या उपचाराच्या खर्चाची चिंता असलेल्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
जोरगेवार म्हणाले की, लहान बाळाला हृदयविकार असल्याचे कळल्यावर अनेक घरांमध्ये उपचाराच्या खर्चाचा मोठा प्रश्न उभा राहतो. खर्च परवडत नसल्याने पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. केवळ पैशाच्या अडचणीमुळे एकाही बालकाचा उपचार थांबू नये, म्हणून सेवा संकल्प अभियानातून हा पुढाकार घेतला आहे. आजच्या शिबिरात 48 बालकांच्या हृदयात छिद्र आढळले असून त्यांच्या पुढील उपचारांची जबाबदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही जोरगेवार यांच्या पुढाकाराने अशी शिबिरे झाली आहेत. त्यातून आतापर्यंत जवळपास 268 बालकांवर मुंबईत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. अनेक बालकांना त्यानंतर नव्याने निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळाली, असेही ते म्हणाले. यंदाच्या शिबिरात ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्या बालकांवरही मुंबईतील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सेवा फक्त एका दिवसाच्या कार्यक्रमापुरती न राहता गरजू माणसाच्या आयुष्यात चांगला बदल घडवणारी असली पाहिजे, असे जोरगेवार यांनी सांगितले. एका बालकावर उपचार होणे म्हणजे त्याच्यासोबत सगळ्या कुटुंबाला नव्या आशेचा आधार मिळणे होय. म्हणूनच आरोग्याच्या क्षेत्रात गरजू नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी पुढेही वेगवेगळे उपक्रम राबवले जातील, असे ते म्हणाले.
शिबिरात तपासणीबरोबरच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या बालकांची पुढील उपचारांसाठी निवडही करण्यात आली. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने त्यांच्यावर उपचार होतील. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू बालकांना मुंबईसारख्या ठिकाणी मिळणाऱ्या तज्ज्ञ वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळणार आहे.
शिबिरात एक चिमुकली नियमित तपासणीसाठी आली होती. दीड वर्षांपूर्वी, अवघ्या एका दिवसाची असताना, आरोग्य शिबिरातील तपासणीत तिच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले होते. तेव्हा जोरगेवार यांनी पुढाकार घेतला आणि मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयात तिच्यावर दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया झाली. आज ती पूर्णपणे निरोगी झाली आहे. तिला हसताना पाहून जोरगेवार भावूक झाले आणि केलेले प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
"एखाद्या चिमुकल्याला आजारातून बाहेर काढून निरोगी आणि आनंदी पाहणे, यापेक्षा मोठे समाधान नाही. तिच्या चेहऱ्यावरचे आजचे हसू हीच आपल्या आरोग्यसेवेच्या प्रयत्नांची खरी पावती आहे," असे जोरगेवार म्हणाले.