मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:33 IST

चंद्रपुरात कंपन्यांवर दबाव आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार, पोलिसांचा इशारा

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत WCL सह १०० हून अधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा, भंगार चोरी आणि खंडणीखोरीवर कडक कारवाईचा निर्णय.

चंद्रपुरात कंपन्यांवर दबाव आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार, पोलिसांचा इशारा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले उचलली असून, तुकुम रोड येथील पोलीस सभागृहात नुकतीच एक विशेष आढावा बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापत्रे, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर आणि पडोलीचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे उपस्थित होते.

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) सह जिल्ह्यातील सुमारे १०० कंपन्यांचे प्रमुख आणि प्रतिनिधीही या बैठकीला हजर होते. औद्योगिक परिसरातील कायदा-सुव्यवस्था, वाढती भंगार चोरी, कामगारांची सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कंपन्यांवर टाकला जाणारा बेकायदेशीर दबाव या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

WCL तसेच इतर कंपन्यांच्या परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रंदिवस गस्त वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. याशिवाय ब्रह्मपुरी ओव्हरब्रिज परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गरजेनुसार अतिरिक्त वाहतूक पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

कामगारांच्या सुरक्षिततेबाबतही बैठकीत गंभीरपणे चर्चा झाली. एखादा अपघात झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी सर्व कंपन्यांनी आपल्या कामगारांचा विमा उतरवणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी धारिवाल कंपनीने कामगारांचे बँक खाते उघडतानाच विमा जोडल्याचे उदाहरण दिले, तर डालमिया सिमेंट कंपनीने पहिल्याच दिवसापासून कामगारांना विमा संरक्षण दिल्याचे सांगितले. इतर कंपन्यांनीही अशा कल्याणकारी धोरणांचे लगेच अनुकरण करावे, असे आवाहन करण्यात आले. कामगारांनी हेल्मेट आणि इतर सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून औद्योगिक आस्थापनांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कामगारांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापनाला धमकावणे, खंडणी मागणे किंवा गैरवाजवी दबाव आणणे असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिला. अशा प्रकारचा कोणताही दबाव आल्यास कंपन्यांनी न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. अशा प्रवृत्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

उद्योगांना सुरक्षित वातावरण देणे आणि कामगारांचे हित जपणे हे प्रशासनाचे मुख्य ध्येय असून, यासाठी पोलीस आणि कंपन्यांमध्ये नियमित समन्वय ठेवला जाईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ