राहुड घाटात अपघातांची मालिका थांबेना; टोल व्यवस्थापक आणि पोलीस निरीक्षकांकडून घाटाची पाहणी
मुंबई-आग्रा महामार्गावरील (NH-3) चांदवड तालुक्यातील राहुड घाटात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. चांदवड टोल व्यवस्थापक आणि पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी घाटाची पाहणी केली.
मुंबई-आग्रा महामार्गावर (NH-3) चांदवड तालुक्यातील राहुड घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. या घाटात तीव्र उतार आणि वळणे आहेत. त्यामुळे इथे वारंवार अपघात होतात आणि हा घाट आता 'मृत्यूचा सापळा' ठरणारा घाट म्हणून ओळखला जात आहे.
राहुड घाट अपघातांचा धोकादायक घाट बनला आहे. या घाटात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अपघातांची ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाही, आणि ती थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. उमराणे प्रेस क्लब आणि नागरिकांच्या वतीने चांदवड टोल प्रशासनाला याआधी निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
घाटात ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि सुरक्षा कठडे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. घाटातून अवघड परिस्थितीत प्रवास करणाऱ्या वाहनांवर कडक नियंत्रण ठेवावे, अशीही मागणी आहे. तसेच रस्त्याची तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षा आराखडा तयार करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांनंतर चांदवड टोल व्यवस्थापक आणि पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी राहुड घाटाची पाहणी केली. या पाहणीत घाटात कोणत्या ठिकाणी अपघाताचा धोका जास्त आहे, याकडे लक्ष देण्यात आले. कोणत्या भागात वाहनांचा वेग आटोक्यात ठेवण्याची गरज आहे, हेही पाहण्यात आले. तसेच अपघात झाला तर तातडीने मदत कशी उपलब्ध करून देता येईल, याचीही पाहणी करण्यात आली.
चांदवड टोल व्यवस्थापकांनी सांगितले की, जे उपाय घ्यायचे होते, ते आपण घेतले आहेत. काही ठिकाणी बोर्ड वाढवले जाणार आहेत. काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची उंची कमी झाली आहे, ती पूर्ण केली जाणार आहे. राहुड घाटात जास्त अपघात हॅवी ट्रक्समुळे होतात, त्यामुळे त्यांच्यावर कॅम्पेन राबवले जाणार आहे, असेही चांदवड टोल व्यवस्थापकांनी म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी सांगितले की, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. अपघातांचे प्रमाण कसे कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. यात स्थानिकांनी दिलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.