मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:41 IST

चाकणमधील रस्त्यांची कामे संथ; PMRDA ने ठेकेदार कंपनीला ठोठावला ७५ लाखांचा दंड

चाकण डी-क्लॉगिंग प्रकल्पातील तीन रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये दंड करण्यात आला आहे. सातही रस्त्यांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

चाकणमधील रस्त्यांची कामे संथ; PMRDA ने ठेकेदार कंपनीला ठोठावला ७५ लाखांचा दंड
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चाकण एमआयडीसी परिसरातील आणि शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) 'चाकण डी-क्लॉगिंग' प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत सात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र ही कामे संथ गतीने चालू असल्याने प्रशासनाने संबंधित ठेकेदार कंपनीला दंड ठोठावला आहे.

तीन रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये असा एकूण ७५ लाख रुपयांचा दंड ठेकेदाराला करण्यात आला आहे. मे. क्रिष्णाई इन्फ्रा. प्रा. लि. ही या कामाची ठेकेदार कंपनी आहे. कामाची गती वाढवण्यासाठी कंपनीला वारंवार सूचना दिल्या गेल्या, तरीही अपेक्षित प्रगती झाली नाही, असे प्रशासनाच्या लक्षात आले.

सातही रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामामुळे आधीच एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच वाहतूक कोंडी आणि अपुरे मनुष्यबळ अशा कारणांमुळे कामांना उशीर होत आहे.

कामे संथ असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठरवताना पोलीस प्रशासनालाही अडचणी येत आहेत, तर नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर PMRDA चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी केली. कामाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर संथ कामाबद्दल ठेकेदाराला दंड करण्याचे आदेश देण्यात आले.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि इतर नागरी प्रश्नांवरून स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांच्याकडून प्रशासनाच्या कामावर सातत्याने टीका होत होती. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण परिसराची पाहणी केली. पायाभूत सुविधा आणि इतर कामे ठराविक कालावधीत पूर्ण करावीत, तसेच कामांचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिल्या. त्यानुसार PMRDA कडून चाकण आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला जात आहे.

चाकणमधील चार रस्त्यांची कामे वेगवेगळ्या कारणांमुळे रखडली आहेत. काही कामांच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. मेदनकरवाडीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. खराबवाडी रस्त्यांबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. नाणेकर वाडीचा मार्ग जोडण्यासाठी जो रस्ता प्रस्तावित आहे, त्याची भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही.

याबद्दल बोलताना PMRDA चे आयुक्त अभिजीत चौधरी म्हणाले, "चाकण शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत, कामाची वेळोवेळी पाहणीही केली जात असून अपेक्षित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय काही रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे."

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यासाठी सहा रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. मात्र या रस्त्यांसाठी लागणारी भूसंपादन प्रक्रिया अजून रखडलेली आहे. त्यापैकी दोन रस्त्यांसाठी सुमारे ७० टक्के ग्रामस्थांची संमती मिळाली आहे.

उर्वरित प्रक्रिया पूर्ण करणे, जमिनींचा प्रत्यक्ष ताबा घेणे आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी आणखी पाच ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ