बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल उभारला; ५४ हजारांहून जास्त बोल्ट वापरले
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात १०० मीटर लांबीचा, १,४०५ मेट्रिक टन वजनाचा स्टील पूल बसवण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात उभारण्यात आला आहे. दिवे-अंजुर गावाजवळ नाशिक महामार्गावर हा पूल बसवला असून त्याची लांबी १०० मीटर आहे. त्याचे वजन तब्बल १,४०५ मेट्रिक टन आहे.
महामार्गावरील वाहतुकीला कमीत कमी अडथळा व्हावा, अशा पद्धतीने हे काम करण्यात आले. त्यासाठी रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती आणि त्याच कालावधीत पुलाचे काम पार पडले.
या पुलाची बांधणी तमिळनाडूतील त्रिची येथील कार्यशाळेत झाली. उभारणीच्या जागेपासून ही कार्यशाळा सुमारे १,३०० किलोमीटर लांब आहे. तेवढ्या अंतरावर तयार झालेली ही संरचना विशेष ट्रेलरवरून महाराष्ट्रात आणण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर तिची जोडणी करून ती ठरलेल्या ठिकाणी बसवण्यात आली.
पुलाच्या निर्मितीत ठरवून दिलेल्या तांत्रिक मानकांनुसार स्टीलची अचूक कापणी, छिद्रे पाडणे, जोडणी आणि रंगकाम करण्यात आले. स्टीलच्या प्रत्येक उत्पादन तुकडीची अल्ट्रासोनिक चाचणी झाली. तसेच वेल्डर आणि पर्यवेक्षक यांना आंतरराष्ट्रीय वेल्डिंग तज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात आले.
प्रकल्पाच्या जागी १०० मीटर लांबीची ही संरचना जमिनीपासून सुमारे १७.५ मीटर उंचीवर तात्पुरत्या आधार रचनेवर जोडण्यात आली. त्यासाठी २२ स्किड अरेंजमेंट आणि ५४ हजार ७६ टीटीएचएसबी प्रकारचे उच्च क्षमतेचे बोल्ट वापरले गेले. पुलाची टिकाऊ क्षमता वाढावी आणि कंपनावर नियंत्रण राहावे, यासाठी सी-५ संरक्षक रंगकाम प्रणाली आणि इलॅस्टोमेरिक बेअरिंग्ज बसवण्यात आली आहेत.
जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन हॉलो जॅक आणि पूर्वताण दिलेले मॅकॅलॉय बार वापरण्यात आले. या साधनांच्या मदतीने स्वयंचलित यंत्रणेद्वारे पूल ओढून ठरलेल्या जागी बसवण्यात आला.
महामार्ग, द्रुतगती मार्ग, मोठ्या नद्या आणि रेल्वे मार्ग ओलांडायचे असतील आणि जास्त लांबीचा स्पॅन लागत असेल, तिथे स्टील पूल उपयोगी ठरतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण २८ स्टील पूल प्रस्तावित आहेत. त्यापैकी १६ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.