बुलढाण्यात जप्त ७२ पैकी ३७ वाहने परत, ३५ वाहनांचा लिलाव सुरू
बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत वाहतूक नियम मोडणाऱ्या तसेच इतर कारणांमुळे दोषी ठरलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली. या कारवाईत एकूण ७२ वाहने जप्त करण्यात आली आणि त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
जप्त केलेल्या वाहनांपैकी ३७ वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. अजूनही विभागाच्या ताब्यात असलेल्या ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
रस्त्यावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग मिळून उपाययोजना करत आहेत. दोन्ही विभाग सार्वजनिक रस्त्यांवर सतत मोहिमा राबवतात. शिस्त न पाळणाऱ्या वाहनचालकांवर आणि अल्पवयीन मुलांच्या सुसाट धावणाऱ्या गाड्यांवर दंडाची कारवाई केली जाते. याशिवाय रस्त्यावर चालवण्याच्या योग्य स्थितीत नसलेल्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडासोबत जप्तीची कारवाईही करतो.
बुलढाणा उपप्रादेशिक विभागाने नियम मोडणाऱ्या चालकांना दंड केलाच, शिवाय त्यांची वाहने जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात ठेवली होती. ज्या वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रे आणि दंडाची रक्कम दिली, त्यांना नियमानुसार वाहने परत देण्यात आली. मात्र काही वाहनधारकांनी ठरलेल्या मुदतीत दंड भरला नाही किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. अशा वाहनांवर नियमानुसार पुढची कारवाई सुरू असून, त्यातल्या ३५ वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापुढेही नियम मोडणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जप्त वाहन सोडवून घ्यायचे असेल, तर वाहनावरचा दंड आणि कर भरावा लागतो, तसेच वाहनाची कागदपत्रे सादर करावी लागतात. वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालवण्याच्या चांगल्या स्थितीत आहे का, हे तपासल्यानंतरच ते मालकाला परत दिले जाते.
लिलावाची प्रक्रिया अशी असते: जप्त वाहनाच्या मालकाला एक, दोन आणि तीन अशा नोटिसा पाठवल्या जातात. नोटिसा पाठवूनही मालक हजर झाला नाही, तर त्या वाहनाच्या लिलावाची पुढची प्रक्रिया राबवली जाते.
बुलढाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पचन नव्हाडे म्हणाले की, कर न भरल्यामुळे किंवा दंड न भरल्यामुळे ज्या वाहनांना अडवून ठेवण्यात आले आहे, त्यांच्या मालकांनी दंड आणि कर भरून आपली वाहने सोडवून न्यावीत. नाहीतर त्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल.
वाहनधारकांनी वाहतूक नियम पाळावेत, गाडीची आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत आणि कर तसेच इतर सरकारी देणी वेळेत भरावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.