हृदय निरोगी, हाडे मजबूत आणि मेंदूलाही फायदा, जाणून घ्या ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे
फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली ही पोषक तत्वांनी भरलेली भाजी आहे. रोजच्या जेवणात हिचा समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती, हाडांचे आरोग्य, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली ही भाजी पोषक तत्वांनी भरलेली असते. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, कॅल्शियम असे अनेक नैसर्गिक घटक आढळतात. रोजच्या जेवणात ही भाजी घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती, हाडांचे आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्वचेसाठीही उपयुक्त ठरते. दुसरीकडे व्हिटॅमिन के हे हाडांसाठी अत्यंत गरजेचे पोषक तत्व मानले जाते. याशिवाय ब्रोकोलीत फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस यांसारखे घटकही असतात. त्यामुळेच वजन कमी करण्यापासून ते संतुलित आहारापर्यंत, वेगवेगळ्या डाएट प्लॅनमध्ये ब्रोकोलीचा हमखास समावेश केला जातो. ब्रोकोली ही कमी कॅलरी असलेली भाजी आहे, तरीही तिच्यात अनेक महत्त्वाची पोषक तत्वे असल्याने ती आरोग्यासाठी विशेष मानली जाते.
सुमारे १०० ग्रॅम ब्रोकोलीतून शरीराला लागणाऱ्या व्हिटॅमिन सीच्या रोजच्या गरजेपैकी जवळपास ९१ टक्के आणि व्हिटॅमिन केच्या गरजेपैकी सुमारे ७७ टक्के भाग भरून निघतो. व्हिटॅमिन सी शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करत रोगप्रतिकारशक्ती बळकट करते, आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही ही भाजी फायदेशीर ठरते. यातील फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. कमी कॅलरी आणि चांगले पोषणमूल्य असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही ब्रोकोली उपयुक्त मानली जाते. संतुलित आहारात ब्रोकोलीचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवण्यास मदत होते.
हृदयाच्या आरोग्यासाठीही ब्रोकोली फायदेशीर भाजी समजली जाते. यातील पोषक घटक आणि संयुगे हृदयविकाराशी निगडित काही धोक्याचे घटक कमी करण्यास मदत करतात, असे काही अभ्यासांतून समोर आले आहे. जे लोक नियमित ब्रोकोली खातात, त्यांच्यात एलडीएल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी असल्याचे या अभ्यासांत दिसून आले आहे. एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि वाढलेले ट्रायग्लिसराइड्स हे हृदयविकाराच्या धोक्याशी जोडलेले महत्त्वाचे घटक मानले जातात.
हाडांच्या मजबुतीसाठीही ब्रोकोलीतील व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतात. रोजच्या संतुलित आहारातून हे घटक पुरेशा प्रमाणात मिळाल्यास हाडांची ताकद टिकवून ठेवण्यास मदत होते. याशिवाय ब्रोकोलीत फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन ए व सी देखील असतात, जे शरीराच्या तसेच हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
काही अभ्यासांनुसार ब्रोकोली खाल्ल्याने मेंदूच्या आरोग्यालाही फायदा होतो. ब्रोकोलीसारख्या क्रूसिफेरस भाज्यांमधील नैसर्गिक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असेही सांगण्यात येते. अशा प्रकारे हाडांपासून हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत विविध अंगांच्या आरोग्यासाठी ब्रोकोली उपयुक्त भाजी मानली जाते.