बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, वन्यजीव सप्ताहाला सुरुवात
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने 2 ते 8 ऑक्टोंबर या काळात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाची आणि जंगल सफारीची सुरुवात आज झाली.
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने 2 ते 8 ऑक्टोंबर या काळात वेगवेगळे उपक्रम आयोजित करून राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. या वन्यजीव सप्ताहाची सुरुवात आणि बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीची सुरुवात आज करण्यात आली.
कार्यक्रमाला बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, सहाय्यक वनसंरक्षक (कोअर) आशिष देशमुख, सहाय्यक वनसंरक्षक (बफर) दत्तात्रय लोंढे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर प्रामुख्याने हजर होते. जंगल सफारीच्या सुरुवातीला नागपूर आणि इतर ठिकाणांहून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीसाठी आलेल्या कुटुंबांचा प्रकल्पाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर जंगल सफारीसाठीच्या जिप्सी गाड्या कोअर क्षेत्रातील सफारी ट्रॅकच्या दिशेने सोडण्यात आल्या.
बोर प्रकल्पात पहिल्या दिवशी जंगल सफारी करणाऱ्यांमध्ये वर्धा येथील संजय सरदार आणि प्रविण जैन, गुजरात येथील विजय पटेल, नागपूर येथील ऋषिकेश निमकाडे, ओमकार पुरंदरे आणि निरज साठे, मुंबई येथील राहुल हिरनवले तसेच काटोल येथील अनिकेत भोयर यांचा समावेश आहे. काही पर्यटकांनी कुटुंबासह बोरच्या जंगल सफारीचा आनंद घेतला.
सफारीच्या उद्घाटनानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. शिवाय नवीन बोर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि बोर व्याघ्र प्रकल्पाच्या चित्रफितीचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
3 ऑक्टोंबर रोजी शाळांमध्ये वन्यजीव विषयावर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि प्रश्नोत्तरे स्पर्धा होणार आहेत. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण आणि वनसृष्टीतील बदलांबद्दल जनजागृती कार्यक्रम घेतला जाणार आहे.
रविवारी, 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत शालेय विद्यार्थी आणि पक्षीप्रेमींसाठी पक्षी निरीक्षणाचा उपक्रम होईल. 5 ऑक्टोंबरला सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत वर्धा-बोरधरण दुचाकी रॅली आणि वनपरिक्षेत्रधिकारी हिंगणी-बोरधरण सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी अधिकारी, कर्मचारी, गाईड, जिप्सी चालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्य तपासणी शिबिर होईल.
6 ऑक्टोंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आणि कर्मचारी, गाईड, जिप्सी चालकांसाठी फोटोग्राफी स्पर्धा होणार आहे. 7 ऑक्टोंबर रोजी गवत कुरण विकास कार्यशाळा आणि महिला सशक्तीकरण कार्यशाळा आहे. 8 ऑक्टोंबर रोजी बक्षीस वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याने सप्ताहाचा समारोप होईल.