शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बीडमध्ये पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट उघड करणारा वैभव चव्हाण झाडाला लटकलेला आढळला, नातेवाईकांना

क्राइम PT24 टीम

इमामपूर शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. अंगावर मारहाणीचे वळ असल्याने नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.

बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत वैभव चव्हाण या तरुणाचा मृतदेह सापडला. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. वैभव मूळचा बीडचा होता. पोलीस भरतीतील बोगस खेळाडू प्रमाणपत्रांचे रॅकेट त्यानेच उघडकीस आणले होते. त्यामुळे त्याच्या संशयास्पद मृत्यूची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यासह राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेतला एक मोठा घोटाळा समोर आला होता. बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड बीडच्या वैभव चव्हाण या तरुणाने केला होता. याच प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ज्याने हे रॅकेट उघड केले, त्यालाच अशा अवस्थेत मृत पाहावे लागल्याने धक्का आणि संताप व्यक्त होत आहे.

वैभवच्या अंगावर मारहाणीचे वळ आणि पायाला जखमा होत्या. त्यामुळे या प्रकरणामागे घातपात असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी मृतदेह झाडाला लटकलेला दिसल्यानंतर त्याच्या कुटुंबाने मोठा आक्रोश केला. हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मृत्यूमागे कुराश संघटनेचा हात असल्याचा गंभीर आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, वैभवने मृत्यूपूर्वी एका मित्राला पाठवलेली ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये वैभवने म्हटले होते, "कुराश संघटनेचं रॅकेट उघडकीस आणल्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझा मृत्यू कशाही पद्धतीने झाला तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल." या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वैभव दोन वर्षांपूर्वी धाराशिव पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. २०२४-२५ मध्ये त्याने खेळाडू कोट्यातून पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याच्याइतकेच गुण असलेल्या एका दुसऱ्या उमेदवाराने खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटली. त्यामुळे वैभवची भरती होण्याची संधी हुकली.

या अन्यायाविरुद्ध वैभवने तीव्र पाठपुरावा सुरू केला. बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा त्याने भांडाफोड केला होता. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस स्टेशनसमोर तब्बल १२ तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी योग्य त्या आश्वासनांची पूर्तता करत तपास सुरू केला आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ