भोकरच्या स्टेट बँकेवर दरोड्याचा प्रयत्न, गावकऱ्यांच्या धाडसाने डाव फसला; पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जळगाव तालुक्यातील भोकर येथे चादरी विकण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या तरुणांनी स्टेट बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.
जळगाव तालुक्यातील भोकर गावात शनिवारी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे हा डाव फसला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गावात चादरी विकण्याच्या बहाण्याने फिरणारे तरुण प्रत्यक्षात बँक लुटण्याच्या तयारीत असल्याची कुणालाही कल्पना नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ जणांची टोळी या बँकेवर काही वेळ टेहळणी करत होती. गावात काही तरुण चादरी विकायला फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे कुणाचे विशेष लक्ष गेले नाही. चादरी विकणाऱ्यांच्या वेशातील याच तरुणांच्या मनात बँक लुटण्याचा डाव शिजत असल्याचा संशय नंतर पुढे आला.
बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीत असण्याची वेळ साधून टोळीने अचानक बँकेत प्रवेश केला. हातात शस्त्रे होती आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी कर्मचाऱ्यांना एका जागी रोखून धरले. अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी चांगलेच घाबरले. त्यानंतर स्ट्राँग रूममधील लॉकरमध्ये ठेवलेली सोन्याची बिस्किटे आणि दागिने लंपास करण्याचा प्रयत्न झाला. हाताला लागेल तेवढी रोकड बॅगांमध्ये भरण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. काही क्षणांतच बँकेत एकच गोंधळ उडाला.
बँकेतल्या गोंधळाची माहिती बाहेर पोहोचताच गावकऱ्यांना संशय आला. चादरी विकण्याच्या बहाण्याने गावात फिरणारे तरुणच या प्रकारात सामील असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्या वेळी संशयित आणि गावकरी यांच्यात झटापट झाली. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, पण तिघांना गावकऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रकरणात धरणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत कारवाई केली. चावलखेडा रेल्वे बोगद्याजवळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून पोलिसांनी दोन संशयितांना पकडले. शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मुक्ताईनगर, सध्या जळगाव) आणि गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. नायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या या दोघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून संशयास्पद बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात दरोड्यातली रोकड किंवा सोन्याचे दागिने असण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी याआधी तिघांना ताब्यात घेतले होते. अशा रितीने एकूण पाच संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.