सयाजी शिंदे यांच्या प्रश्नानंतर वन विभाग नरमला, बेला गावाजवळ वृक्षारोपणाला परवानगी
नागपूर जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीच्या देवराईसाठी वन विभागाने आधी जागा नाकारली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर वृक्षारोपण केले जाईल, असे आश्वासन मिळाल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीने आपल्या गावाजवळ देवराई उभी करण्यासाठी वन विभागाकडे जागा मागितली होती. या कामात ग्रामपंचायतीसोबत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन'चे प्रमुख सयाजी शिंदे यांची संस्थाही होती. पण वन विभागाने ही जागा द्यायला नकार दिला. ती राखीव वनक्षेत्र आहे, त्यामुळे तिथे देवराई करता येणार नाही आणि वृक्षारोपणालाही परवानगी मिळणार नाही, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
या नकारावर सयाजी शिंदे चांगलेच संतापले होते. झाडे लावायला परवानगीचे बंधन कशासाठी, असा संतप्त सवाल त्यांनी केला. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोप असा की, वन विभाग ज्या जागेला राखीव वनक्षेत्र म्हणतो, तिथे एकही झाड नाही. उलट काही जणांनी त्या जागेवर अतिक्रमण करून नियमबाह्य पद्धतीने शेती सुरू केली आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर आज सयाजी शिंदे यांनी नागपुरात वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. वन क्षेत्रावर वृक्षारोपण करता येत नाही, असा कोणताही नियम नाही, हे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
शिंदे यांनी सांगितले की, वन विभागाच्या या चुकीच्या वागण्याबद्दलच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विचारणा केली. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, बेला गावाजवळच्या त्या जागेवर आता वृक्षारोपण केले जाईल आणि तिथले अतिक्रमण वन विभाग काढून टाकेल. या ठिकाणी आणखी 25 एकर जागाही आम्ही मागणार आहोत, असे शिंदे म्हणाले.
यात कोण चूक आणि कोण बरोबर, अशा वादात आम्ही आता पडणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याऐवजी जास्तीत जास्त झाडे लावण्यावर लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
पुढच्या योजनेबद्दलही शिंदे यांनी सांगितले. विदर्भातही आता अनेक देवराया उभ्या करणार आहोत. पुढील काही काळात शंभर देवराया उभ्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक देवराईत किमान 500 प्रजातींची झाडे असावीत, असाही आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
गेल्या 100 वर्षांत आपण प्रचंड वृक्षतोड करून स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतले आहे, असे शिंदे म्हणाले. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तरी आपण वृक्षारोपणाबाबत गंभीर होऊ, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.