नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा भाजप-सत्ताधाऱ्यांना सवाल
बलात्काराचा गुन्हा दाखल असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अटकेवरून ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांना अटक कधी होणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात २२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कारासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणमध्ये पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आक्रमक होतात आणि लगेच मीडिया ट्रायल सुरू होते, असे ते म्हणाले. मात्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. नरेंद्र पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना कोणतेही राजकीय संरक्षण न देता तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करून मदत करण्याच्या बहाण्याने तिला बोलावण्यात आले, असा आरोप आहे. त्यानंतर तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरातील एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तिथे शस्त्राचा धाक दाखवून तिला दारू पाजण्यात आली आणि लैंगिक अत्याचार करण्यात आला, असा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नरेंद्र पवार यांनी त्यांच्यावरील सगळे आरोप फेटाळले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे असून बदनामी करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू नये म्हणून आपण पदे सोडत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणात पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. केडीएमसीतील काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली असून, अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वरुण सरदेसाई यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय स्थितीवरही भाष्य केले. केडीएमसीमध्ये अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्त्यांबाबतही ठोस निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दोन्ही पक्षांमधील वाद असाच सुरू राहिला, तर नागरिकांची कामे कधी होणार, असा सवाल त्यांनी केला.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी वरुण सरदेसाई कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले होते. कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉलमध्ये झालेल्या बैठकीला सरदेसाई यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसी गटनेते उमेश बोरगावकर, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी नरेंद्र पवार प्रकरणासह केडीएमसीतील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. नरेंद्र पवार प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.