रेल्वे प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांकडे मागणी, बदलापूर-कर्जत मार्गाला गती देण्याची विनंती
डोंबिवलीत ठाणे-मुंबई भागातील 48 रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत निवेदन दिले.
मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांना आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या एका बैठकीत ठाणे-मुंबई भागातील तब्बल 48 रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवाशांची सुरक्षितता आणि विविध भागांना थेट कनेक्टिव्हिटी देणे या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
प्रवासी संघटनांनी सर्वप्रथम कळवा-ऐरोली रेल्वे लिंकचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली. या मार्गामुळे ठाणे आणि नवी मुंबई भागातील प्रवाशांना अधिक थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळू शकते, असे संघटनांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावरील प्रकल्पाला गती द्यावी, अशीही मागणी संघटनांनी मांडली. हा मार्ग विकसित झाल्यास संबंधित भागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढू शकते, असे प्रवासी संघटनांनी सांगितले.
कल्याण-कसारा मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे लाईन उभारण्याच्या प्रकल्पालाही वेग द्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरील वाढता ताण पाहता या मार्गाची क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे संघटनांनी नमूद केले. यासोबतच ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा दरम्यान शटल सेवा सुरू करावी, अशीही विनंती करण्यात आली, जेणेकरून या मार्गावरील प्रवाशांना थेट प्रवासाची सोय मिळेल.
लोकल फेऱ्यांमधील अंतर म्हणजेच हेडवे कमी करण्यासाठी आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा वापरावी, अशी मागणीही यावेळी मांडण्यात आली. सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत केल्यास उपलब्ध रेल्वे मार्गाचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येईल, असे संघटनांचे म्हणणे आहे. याखेरीज दिवा-वसई-पनवेल दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवावी आणि कल्याण जंक्शनपासून CSMT पर्यंतच्या रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता वाढवावी, अशा मागण्याही निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
प्रवासी संघटनांनी सादर केलेले सविस्तर निवेदन रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारले आणि या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रवाशांच्या समस्यांबाबत शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवाशांना अधिक सुरक्षित व थेट प्रवासाची सुविधा देणे तसेच प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी संबंधित पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाहीही चव्हाण यांनी दिली.
या बैठकीला कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, भालचंद्र लोहकरे, नवरे काका, मधुताई कोटियन, लताताई आरगडे, नंदकुमार देशमुख, अनिताताई, वंदनाताई सोनवणे, सिद्धेश देसाई, अनिकेत घमंडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.