जास्वंदीच्या उरलेल्या फुलांपासून घरच्या घरी बनवा नॅचरल हेअर कंडिशनर
गणपती पूजेनंतर उरलेली जास्वंदीची फुले फेकून न देता त्यांचा वापर करून केसांसाठी घरगुती कंडिशनर कसे बनवावे, याची सोपी पद्धत.
राज्यासह देशभरात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. गणपतीच्या पूजेसाठी आवर्जून जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो आणि लाल जास्वंदी बाप्पाला वाहिली जाते. पण ही फुले फक्त पूजेपुरतीच उपयोगी नसतात, तर केसांसाठीसुद्धा खूप गुणकारी ठरतात. पूजा झाल्यानंतर बऱ्याचदा फुले शिल्लक राहतात आणि त्यांचं नेमकं काय करायचं हे बऱ्याच जणांना सुचत नाही. अशी उरलेली फुले फेकून देण्याऐवजी केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरता येतात. जास्वंदीच्या फुलांपासून नॅचरल कंडिशनर कसा बनवायचा, याची पद्धत इथे दिली आहे. या पद्धतीने बनवलेला कंडिशनर केस मऊ ठेवण्यास मदत करतो.
वातावरणातील बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि वारंवार केमिकल हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होते. केस खूप कोरडे आणि निस्तेज होतात. याशिवाय केसांमध्ये कोंडा, केस गळणे, केस तुटणे अशा समस्या वाढून केसांची वाढ थांबते. त्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल प्रॉडक्टऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा, यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतात.
जास्वंदीच्या फुलांपासून कंडिशनर बनवण्यासाठी जास्वंदीची फुले, मेथी दाणे, जास्वंदीची पाने, अळशीच्या बिया आणि पाणी इतक्याच गोष्टी लागतात. हे पदार्थ स्वयंपाकघरात सहज मिळतात. कंडिशनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी जास्वंदीची फुले आणि पाने पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर वाटीत ही स्वच्छ केलेली फुले आणि पाने, मेथी दाणे आणि अळशीच्या बिया एकत्र भिजत घालावीत. रात्रभर भिजत ठेवल्यास फुलांचा अर्क पाण्यात उतरतो. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण हलक्या हाताने दाबून टोपात ओतावे आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावे. पाच ते सात मिनिटं मंद आचेवर पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा.
तयार केलेले मिश्रण घट्टसर असतानाच गाळून घ्यावे. जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेले हे कंडिशनर काचेच्या एअर टाईट डब्यात साठवून ठेवता येते, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही. केस शाम्पूने धुऊन झाल्यानंतर हे कंडिशनर केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करावा आणि दोन मिनिटं ठेवून केस पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवावेत. जास्वंदीच्या फुलांमध्ये अमिनो ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असे अनेक घटक आढळतात, ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार दिसतात.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.