रील्सचे व्यसन आणि फोन काढल्यावर चिडचिड? मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी सोप्या टिप्स
इंटरनेट आणि सोशल मिडियाचा प्रभाव इतका वाढला आहे की लहान मुलांनाही रील्सचे व्यसन लागले आहे. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स.
इंटरनेट आणि सोशल मिडियाचा प्रभाव अलिकडे इतका जास्त वाढला आहे की लहान मुलांनाही रील्सचे व्यसन लागले आहे. २ ते ३ वर्षांची चिमुकलीही आता फोन दाखवल्याशिवाय जेवण करत नाहीत. फोनचा हा वाढता प्रभाव पाहता अनेक देशांनी किशोरवयीन मुलांसाठी सोशल मिडियावर बंदी देखील घातली आहे. सोशल मिडिया मनोरंजन आणि माहितीचे साधन असले तरी याचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. मोबाईल फोनचा अधिक स्क्रिनटाईम मानसिक आरोग्यावर परिणाम करु लागतो. बऱ्याचदा मुलांकडून जेव्हा मोबाईल परत घेतला जातो किंवा मोबाईल वापरासाठी त्यांना मनाई केली जाते तेव्हा ती अधिक हट्टी होऊ लागतात आणि चिडचिड करु लागतात. अशात मुलांना मोबाईलपासून दूर कसे करावे हा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो.
डिजिटल जग लहान मुलांना कंट्रोल करतंय
संशोधन सांगते की मोबाईलचा सततचा वापर लहान मुलांच्या आनंदावर आणि त्यांच्या सवयींवर वाईट परिणाम करतो. यामुळे मेंदूत डोपामाइन नावाचे हॉर्मोन तयार होते. ही प्रक्रिया हातातून फोन काढून घेतल्याने तुटते, ज्यामुळे मुलं अस्वस्थ होतात, त्यांच्यातील निराशा वाढते आणि ती चिडचिड करु लागतात. यामुळेच रागाच्या भरात मुलांच्या हातून फोन हिसकावण्याआधी प्रेमाने त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या कामांत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मुलांना कोणताही दबाव जाणवणार नाही आणि स्वमर्जीने ती फोनचा वापर कमी करतील.
मैदानी खेळांमध्ये मुलांना गुंतवा
पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल फोन्स नव्हते तेव्हा मुलं मैदानी खेळांमध्ये अधिक रमत होती. यामुळे मुलांची शारीरिक वाढही चांगली होते, ज्यामुळे मैदानी खेळ त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मुलांना आपल्या लहानपणीचे मैदानी खेळ शिकवा आणि थोडा वेळ त्यांच्यासोबत हे खेळ खेळा. त्यांना सायकलिंग करायला द्या. रोजच्या जीवनात थोडा वेळ मुलांसाठी काढून त्यांच्यासोबत हे खेळ आपुलकीने खेळा आणि याचे महत्त्व त्यांना पटवून द्या. यामुळे आपोआपच ती खेळात रमतील आणि फोनचा वापर कमी करतील.
ओरडू नका, समजावून सांगा
लहान मुलांचा स्वभाव असतो की त्यांना जे करण्यासाठी मनाई केली जाते, मुलं तेच काम आधी करायला जातात. ओरडा त्यांच्या मनावर वाईट परिणाम करु शकतो. यामुळे त्यांच्या मनात पालकांप्रती द्वेष निर्माण होईल आणि नात्यात दुरावाही येईल. म्हणूनच मुलांना ओरडून सांगण्याऐवजी एका मित्राप्रमाणे त्यांना गोष्ट समजावून सांगा. त्यांच्यासोबत संवाद साधा आणि चित्रकला, पॉटरी, गायन, नृत्य, DIY आर्ट अशा दुसऱ्या कलाकुसरीच्या गोष्टींत त्यांना रमवून ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्यांचा वेळही वाया जाणार नाही आणि काही चांगले कौशल्य त्यांच्या अंगी लागतील.