सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:21 IST

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या 'आदि अनंत'चा ट्रेलर आला, १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत

आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित 'आदि अनंत' हा मराठी चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या 'आदि अनंत'चा ट्रेलर आला, १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत 'आदि अनंत' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कधी हट्ट, कधी मिश्किल संवाद, कधी एकमेकांना दिलेली साथ आणि कधी मनाला भिडणारे क्षण, अशा अनेक रंगांनी सजलेली आजोबा आणि नातवाच्या नात्याची गोष्ट या चित्रपटात आहे. हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेलर लाँच सोहळ्याची खासियत म्हणजे या ट्रेलरचे अनावरण 'आदि अनंत' टीमच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून एका आगळ्यावेगळ्या कौटुंबिक गोष्टीची झलक पाहायला मिळाली. आजोबा-नातवाच्या नात्यातील गंमतीजंमती, भावनिक चढ-उतार आणि नात्यांना नवी दिशा देणारे प्रसंग या ट्रेलरमध्ये एकत्र गुंफलेले आहेत. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढते.

प्रत्येक घरात आजी-आजोबांच्या काही खास सवयी असतात, नातवंडांचे हट्ट असतात आणि त्यातून अनेक अविस्मरणीय किस्से तयार होतात. 'आदि अनंत'मधले आजोबा आणि नातू यांचे नातेही असेच वेगळ्या रंगांनी खुलताना दिसते. दोन पिढ्यांमधील विचारांची गंमत, एकमेकांशी जुळवून घेण्याची धडपड आणि नात्यात दडलेली ओढ यांतून चित्रपटाची कथा आकार घेत असल्याचे दिसते. ट्रेलरमधील प्रसंग या नात्याची भावनिक बाजू तर दाखवतातच, पण त्यातला सहज विनोद आणि मनोरंजनही समोर आणतात.

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, "आजोबा आणि नातवाचं नातं पडद्यावर मांडताना मला त्यातील सहजता आणि त्यांच्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग महत्त्वाचे वाटले. या नात्यात कधी गंमत असते, कधी मतभेद असतात, तर कधी शब्दांत न मावणारी जवळीक असते. 'आदि अनंत' मधून हे सगळे पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्या माणसांची आठवण नक्की येईल. यामध्ये आजोबा-नातवाचं नातं असले तरीही हा प्रत्येक नात्याचा चित्रपट आहे, जो संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहाणं गरजेचं आहे."

निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे सांगतात, "'आदि अनंत'ची गोष्ट तिच्यातील साधेपणामुळे आणि नात्यांमधील वेगळेपणामुळे आम्हाला भावली. आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबासोबत घालवलेले क्षण किती महत्त्वाचे असतात, हे या चित्रपटातून अधोरेखित होते. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी या कथेला खास रंगत देते. मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना आपुलकीची जाणीव करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे."

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत 'आदि अनंत'ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ