सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
08:21 IST

भाजप देईल तेच घ्यावं लागतं, अंबादास दानवे यांची शिंदेसेना-राष्ट्रवादीवर टीका

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी परभणीतील पत्रकार परिषदेत महायुतीतील घटकपक्षांवर तसंच भाजपवर टीका केली. सुनील तटकरे आणि अभिजीत दिपके यांच्या तिरंगा आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला.

भाजप देईल तेच घ्यावं लागतं, अंबादास दानवे यांची शिंदेसेना-राष्ट्रवादीवर टीका छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू असल्याचं चित्र दिसतं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सगळ्या वातावरणात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीवरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं दिसतं. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाष्य केलं.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दानवे यांनी परभणीत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीतील राजकीय घडामोडींवर आणि अभिजीत दिपके यांच्या तिरंगा आंदोलनावरून सरकारवर टीका केली.

महायुतीतील अंतर्गत मतभेदांबद्दल बोलताना दानवे यांनी भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवलं. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांना भाजप जे देईल तेच घ्यावं लागतं, असं ते म्हणाले. दानवे म्हणाले, "राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेला अजिबात मान नाही. त्यांना काही बोलण्याची मुभा नाही. त्यामुळे जे असेल ते घ्या, अशी वागणूक भाजप त्यांना देते."

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखात्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. तटकरे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित करत, ते कधी भाजपमध्ये जातील याची खात्री नाही, असं दानवे यांनी सांगितलं.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या 'लेहरा दो तिरंगा' आंदोलनाचा उल्लेख करून दानवे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. "भाजपने तिरंगा रॅली काढली तर ती देशभक्ती आणि अभिजीत दिपके यांनी तिरंगा घेऊन चला म्हटलं तर ते देशद्रोही का?" असा सवाल त्यांनी विचारला.

इंग्रजांच्या काळात भारतात तिरंगा फडकवणं गुन्हा मानलं जात होतं, तशीच परिस्थिती आज भाजपच्या काळात निर्माण झाली आहे, असा आरोप दानवे यांनी केला. तिरंगा घेऊन जाणाऱ्या दिपके यांच्याबद्दल देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे, असंही ते म्हणाले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ