इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी रुग्णालयावरील हल्ल्यात ढिगाऱ्याखाली, बचाव पथकाकडून सुखरूप सुटका
तज्ज्ञ परिषदेच्या सदस्याने अल अरबी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचा खुलासा केला आहे.
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावले असल्याचे समोर आले आहे. तेहरानमधील एका मोठ्या रुग्णालयावर अमेरिका आणि इस्रायली दलांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता आणि खामेनी त्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम राबवत त्यांना सुखरूप बाहेर काढले. इराणच्या तज्ज्ञ परिषदेचे (Assembly of Experts) सदस्य मोहसेन हैदरी यांनी अल अरबी टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही संवेदनशील माहिती दिली.
हैदरी यांच्या म्हणण्यानुसार, या घडामोडींची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पहिल्या हवाई हल्ल्यांपासून झाली. त्या हल्ल्यांमध्ये खामेनी जखमी झाले होते, त्यामुळे त्यांना तातडीने तेहरानमधील एका प्रमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शत्रूच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांचा ठावठिकाणा शोधून तेहरानमधील तीन मोठ्या रुग्णालयांना लागोपाठ लक्ष्य करत बॉम्बहल्ला केला. ज्या तिसऱ्या रुग्णालयावर हल्ला झाला, त्याच इमारतीत खामेनी यांच्यावर उपचार सुरू होते. स्फोटांमुळे संपूर्ण इमारत कोसळली, पण वेळेवर पोहोचलेल्या आपत्कालीन यंत्रणांनी त्यांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले.
या हल्ल्याच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये नव्या सर्वोच्च नेत्याची निवड प्रक्रिया अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडली. हैदरी यांनी सांगितले की कोम शहरातील तज्ज्ञ परिषदेच्या मुख्य कार्यालयावरही शत्रूकडून हवाई हल्ला झाला होता. या हल्ल्यात परिषदेच्या ८ सदस्यांचा मृत्यू झाला आणि निवडणुकीशी संबंधित अधिकृत कागदपत्रे जळून खाक झाली. तरीही उर्वरित सदस्यांनी एका गुप्त ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
सचिवालय उद्ध्वस्त झाल्याने आणि मतपत्रिका उपलब्ध नसल्याने सर्व सदस्यांनी कागदाच्या लहान चिठ्ठ्यांवर मतदान केले. तज्ज्ञ परिषदेच्या एकूण ५९ सदस्यांपैकी ५० सदस्यांनी मोजतबा खामेनी यांच्या बाजूने मतदान केले, तर प्रतिस्पर्धी उमेदवार आयातुल्ला अलीरेझा अराफी यांना केवळ ८ मते मिळाली आणि एका सदस्याने मतदानात भाग घेतला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव या निवडीची अधिकृत घोषणा लगेच राष्ट्रीय दूरदर्शनवरून करण्यात आली नाही. ५६ वर्षांचे मोजतबा औपचारिक प्रशासकीय पदावर नव्हते, पण ते बराच काळ आपले वडील अयातुल्ला अली खामेनी यांचे मुख्य सल्लागार म्हणून पडद्यामागून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.
दरम्यान मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत जगभरात वेगवेगळ्या शंका आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाचा हवाला देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की या हल्ल्यात खामेनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला, विशेषतः हात आणि पायाला मोठी दुखापत झाली आहे. मात्र इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी हे सगळे दावे फेटाळले आहेत. पेझेश्कियन यांनी स्पष्ट केले की मोजतबा खामेनी पूर्णपणे ठणठणीत आहेत आणि त्यांनी नुकतीच देशाच्या धोरणात्मक निर्णयांवर सुमारे सात तास बैठक घेतली. सध्या इराणचे सर्वोच्च नेते म्हणून ते सगळे महत्त्वाचे प्रशासकीय आणि लष्करी निर्णय सक्षमपणे घेत आहेत.