अहमदाबाद अग्निशमन दलात टोयोटा हिलक्सच्या 15 बचाव गाड्या दाखल
अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेने ताफ्यात 15 टोयोटा हिलक्स गाड्यांचा समावेश केला असून त्या पूर्णपणे बचाव कार्यासाठी बदलून घेतल्या आहेत.
टोयोटा हिलक्स म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दणकट, कुठेही जाऊ शकणारी गाडी. डोंगर असो, दगड असो किंवा चिखल, ही गाडी कुठेही सहज जाते. आतापर्यंत लोक ही गाडी हौस म्हणून किंवा सामान वाहून नेण्यासाठी वापरत होते. पण आता याच गाडीला एक वेगळंच काम मिळालं आहे, ते म्हणजे लोकांचे जीव वाचवण्याचं काम.
अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा म्हणजे AFES ने आपल्या ताफ्यात अशा 15 टोयोटा हिलक्स गाड्या दाखल केल्या आहेत. या साध्या गाड्या नाहीत, तर त्यांना पूर्णपणे बदलून अग्निशमन आणि बचाव कार्यासाठी खास तयार करण्यात आलं आहे. जिथे मोठी अग्निशमन गाडी पोहोचू शकत नाही, तिथे ही हिलक्स सहज पोहोचू शकते.
महापालिकेने या गाडीची निवड का केली, याचं उत्तर तिच्या इंजिन आणि मॉडेलमध्ये दडलं आहे. या गाडीत 2.8 लिटरचं टर्बो-डिझेल इंजिन असून ते 204 HP पॉवर आणि 500 Nm टॉर्क देतं. गाडीची बॉडी लॅडर-फ्रेमवर बनवलेली असून तिच्या चारही चाकांना पॉवर मिळते, म्हणजेच 4 x 4 सिस्टम आहे. एखादी इमारत कोसळली आणि रस्त्यावर सगळीकडे ढिगारा पसरला, तर अशावेळी अग्निशमन दलाची मोठी गाडी तिथवर पोहोचू शकत नाही. अशा वेळी हीच छोटी हिलक्स गाडी घटनास्थळी पोहोचू शकते. त्यामुळेच महापालिकेने या गाडीची निवड केली. या गाड्या फक्त आग विझवण्यासाठीच नाही, तर बचावकार्यासाठी आणि अपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीसुद्धा वापरल्या जाणार आहेत.
या 15 गाड्यांसाठी अहमदाबाद महापालिकेने जवळपास 19.74 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजे एका गाडीमागे तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. विशेष म्हणजे या जुन्या मॉडेलच्या हिलक्स गाड्या आहेत, नवीन फेसलिफ्ट मॉडेल नाही. तरीही त्यांना खास बनवून घेण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर महापालिकेने आणखी 10 बचाव बोटीसुद्धा घेतल्या असून त्यासाठी 3.40 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पूर आल्यास पाण्यातूनही लोकांना वाचवता यावं, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. एकूणच आपत्तीच्या वेळेसाठी पूर्ण तयारी ठेवण्यात आली आहे.
या गाड्यांना अशा पद्धतीने सजवण्यात आलं आहे की त्या एखाद्या छोट्या बचाव केंद्रासारख्याच वाटाव्यात. गाडीत हायड्रॉलिक कटर आणि स्प्रेडर बसवण्यात आले आहेत, म्हणजे अपघातात गाडीचा दरवाजा जाम झाला असेल किंवा इमारत कोसळून कोणी अडकलं असेल, तर लोखंड कापून त्या व्यक्तीला बाहेर काढता येतं. जड ढिगारा हटवण्यासाठी वेल्डिंग आणि कटिंग मशीनही गाडीत आहे.
रात्रीच्या वेळी किंवा अंधारात काम करता यावं, यासाठी गाडीवर मोठा टेलिस्कोपिक लाईट बसवण्यात आला असून त्यात हाय-पॉवर LED फ्लडलाईट आहेत, त्यामुळे अंधारातही दिवसासारखा उजेड मिळतो. गाडीच्या मागच्या बाजूला एक खास कप्पा बनवण्यात आला असून त्यात दोरखंड, लाईफ जॅकेट आणि प्रथमोपचाराचं साहित्य ठेवण्यात आलं आहे. रस्ता अपघात असो, इमारत कोसळणं असो, पूर असो किंवा लिफ्टमध्ये कोणी अडकलं असो, ही गाडी सगळीकडे धावून जाणार आहे.
घटना घडल्यानंतर पहिल्या एका तासात मदत मिळाली, तर जीव वाचण्याची शक्यता जास्त असते, याला गोल्डन अवर असं म्हटलं जातं. हिलक्स गाडी याच गोल्डन अवरमध्ये घटनास्थळी पोहोचून जीव वाचवण्याचं काम करणार आहे. मोठ्या गाड्यांच्या तुलनेत ही गाडी लहान आणि वेगवान असल्यामुळे अहमदाबादच्या अरुंद गल्ल्यांमध्येही ती सहज पोहोचू शकेल.