भोंदूगिरीच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप; मनोहर भोसलेसह २४ आरोपींवर मोक्का लावला
अघोरी पूजेचे आमिष दाखवून भक्तांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मनोहर ऊर्फ 'मामा' भोसले याच्या टोळीविरुद्ध मोका कायद्यातील कलमे लावली आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अघोरी पूजा, भोंदूगिरी आणि खोट्या धार्मिक विधींचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 'मामा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर ऊर्फ मामा भोसले याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार, म्हणजेच मोक्कानुसार, कारवाई केली आहे. मनोहर भोसले हा करमाळा तालुक्यातील उंदरगावचा आहे. तपासात या टोळीतील एकूण २४ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यांत भोसले याचा प्रमुख साथीदार आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांचाही समावेश आहे.
कुर्डवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात या टोळीच्या कारवायांचे स्वरूप समोर आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे, खोट्या आणि अघोरी पूजेचे आमिष दाखवून भक्तांकडून देणगीच्या नावाखाली रोख रक्कम घेतली जात होती. काही पैसे ऑनलाइन पद्धतीनेही स्वीकारले जात होते. त्यानंतर या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी यंत्रणा वापरली जात होती. प्रत्यक्ष पैसे घेणारे, पैसा इकडून तिकडे वळवणारे आणि तो ठिकाणी लावण्यासाठी मदत करणारे, अशा सर्वांचा २४ आरोपींत समावेश आहे.
मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांना २५ एप्रिल २०२६ रोजी अटक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवून टोळीच्या आर्थिक व्यवहारांचा माग काढला. तपासात असे पुढे आले की, मामा भोसलेच्या सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेतले जात होते आणि ते पुढे वेगवेगळ्या मार्गांनी वळवले जात होते.
पोलीस तपासानुसार, आरोपी रामदास झोळ आणि माया झोळ यांच्या स्वामी चिंचोळी (ता. दौंड, जि. पुणे) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचा कथित आर्थिक व्यवहारांसाठी वापर झाला. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने फसवणुकीतून मिळालेली रोख रक्कम संस्थेत आणली जात होती. ती रक्कम कायदेशीर असल्याचे भासवून पुन्हा मनोहर भोसलेकडे पोहोचवली जात होती, असेही तपासात समोर आले आहे.
या संघटित कारवायांमुळे सोलापूर ग्रामीण, पुणे जिल्हा आणि आसपासच्या भागातील लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मनोहर भोसले हा यापूर्वी एका गुन्ह्यात अटक होऊन जामिनावर बाहेर आला होता, पण त्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांत सक्रिय झाल्याचे तपासात पुढे आले. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांतून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
टोळीचा संघटितपणा, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि लोकांमध्ये पसरलेली दहशत लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मोका कायद्यातील कलमांचा समावेश करण्यासाठी हा प्रस्ताव होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे लावण्यात आली.
मोक्का लावण्यामागची कारणे पोलिसांच्या तपासातील निष्कर्षांतच आहेत. संघटित पद्धतीने लोकांची आर्थिक फसवणूक, पैशांचे ऑनलाइन आणि रोख व्यवहार, फसवणुकीच्या रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी यंत्रणा आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता खरेदी, या सर्वांचा विचार करून हा कायदा वापरण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा करत आहेत. अंधश्रद्धा, अघोरी पूजा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशी फसवणूक होत असेल तर लोकांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.