ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई, येरवडा कारागृहात स्थानबद्ध
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कोळी यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. कोळी यांचे वय ३७ वर्षे असून ते अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक आणि इतर विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्या 'एमपीडीए' (MPDA) कायद्यानुसार ही कारवाई झाली असून, त्यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षावर टीका झाली की, त्याला आक्रमक भाषेत उत्तर देणारे नेते म्हणून शरद कोळी ओळखले जातात.
काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात फरार असताना कोळी यांना पोलिसांनी सांगली येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेश क्रमांक २०२६/डी.सी.बी/२/आरआर/४७६१(१)/२०२६ (दिनांक १७/०९/२०२६) अन्वये त्यांच्या स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली.
रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोळी यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ती झाल्यावर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, कोळी यांच्यावर सोलापूर आणि आसपासच्या परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवलेले आहेत. यात वाळू चोरी आणि तस्करी, व्यापाऱ्यांकडे आणि नागरिकांकडे खंडणी मागणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, असे प्रकार आहेत. या सगळ्या कृत्यांची गंभीर दखल घेऊन ही कारवाई केल्याचे पोलीस ठाण्याने सांगितले.
ही कारवाई 'महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजारे, बेकायदेशीर सावकार बेकायदेशीर लॉटरी चालवणारे आणि मानवी अपहरण करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१' (सुधारणा १९९६, २००९, २०१५ व २०२५) च्या कलम ३(१) प्रमाणे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईचे नेतृत्व पंढरपूर तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जिल्लावार यांनी केले. या कारवाईत त्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि सहाय्य पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यावर थेट एक वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.