आधारच्या पाच नव्या सुविधा: ठसे जुळले नाहीत तरी चेहरा दाखवून रेशन मिळणार
आधार दिवसानिमित्त UIDAI ने पाच नव्या सुविधा जाहीर केल्या आहेत. रेशन, आधार सेंटरवरील रांगा, छोट्या कंपन्या आणि संस्था, तसेच वेबसाईट यांच्याशी संबंधित या सुविधांचा फायदा सामान्य लोक, शेतकरी आणि वृद्धांना होणार आहे.
आधार कार्ड वापरणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आधार दिवसानिमित्त UIDAI ने पाच नव्या सुविधा जाहीर केल्या आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आणि वृद्धांना होईल, असे सांगितले जात आहे.
पहिला बदल रेशनबाबत आहे. रेशन दुकानात बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून अनेकांना रेशन मिळत नाही. शेतात काम करणारे, मजुरी करणारे आणि वृद्ध लोक यांच्या बोटांचे ठसे घासलेले असतात, त्यामुळे e-POS मशीनवर ठसा येत नाही आणि दुकानदार रेशन देत नाही. आता UIDAI ने फेस ऑथेंटिकेशन सुरू केले आहे. म्हणजे फक्त चेहरा स्कॅन करूनही रेशन मिळू शकेल. ग्राहकाची परवानगी घेऊन दुकानदार फोटो काढेल आणि रेशन देईल. ही सुविधा हळूहळू सगळ्या रेशन दुकानांत सुरू होत आहे.
दुसरी सुविधा आधार सेंटरवरच्या गर्दीशी जोडलेली आहे. सेंटरवर मोठी रांग असते, तासन्तास उभे राहावे लागते आणि महिला व वृद्धांना खूप त्रास होतो. आता UIDAI ने टोकन सिस्टीम आणली आहे. सेंटरवर गेल्यावर टोकन नंबर मिळेल, रांगेत उभे राहण्याची गरज नाही. खुर्चीवर बसायचे, स्क्रीनवर नंबर आला की आत जाऊन काम करून घ्यायचे. त्यामुळे गर्दी कमी होणार आणि काम लवकर होणार आहे.
तिसरा बदल छोट्या कंपन्यांसाठी आणि NGO साठी आहे. याआधी आधार व्हेरिफिकेशन करायचे असेल तर मोठी प्रोसेस होती आणि महागडी मशीन घ्यावी लागत होती. आता UIDAI ने नियम सोपे केले आहेत. ज्या कंपन्यांना कमी प्रमाणात आधार तपासायचे आहे, त्या AUA आणि e-KYC एजन्सीच्या मदतीने थेट काम करू शकतात. त्यांना वेगळी यंत्रणा उभी करावी लागणार नाही, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचा आणि संस्थांचा खर्चही वाचेल.
चौथी सुविधा म्हणजे SWIK 2.0 नावाचे नवे पोर्टल. एखाद्या संस्थेला आधारचे काम करण्याची परवानगी हवी असेल तर आधी कागदपत्रे घेऊन ऑफिसला अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता सगळे काम ऑनलाईन होईल. संस्था घरबसल्या अर्ज करू शकते आणि कागदपत्रे अपलोड करू शकते. सरकारी ऑफिसला जाण्याची गरज उरणार नाही, आणि काम पारदर्शक व फास्ट होईल.
पाचवा बदल UIDAI च्या वेबसाईटचा आहे. वेबसाईट पूर्णपणे नव्याने बनवली जात आहे. अंध लोकांसाठी स्क्रीन रीडर, मोठे फॉन्ट आणि कीबोर्डने वापरता येण्याची सोय असेल. सध्या वेबसाईट 13 भाषांमध्ये आहे, ती आता 23 भाषांमध्ये येणार आहे. त्यात मराठीचाही समावेश असेल, म्हणजे आधारची माहिती आणि फॉर्म मराठीतही मिळतील. देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला आपल्या भाषेत आधार समजू शकेल.
या पाच सुविधांमुळे आधार वापरणे अजून सोपे होणार आहे. विशेषतः रेशनचा प्रश्न सुटल्यामुळे गरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.