शंभरीपार डॉक्टर जोहारींची घशाची तपासणी, ५० वर्षांपूर्वीच्या रुग्ण डॉक्टरांनीच केली
जसलोक हॉस्पिटलमध्ये ईएनटी सर्जन डॉ. ए. सी. जोहारी यांची तपासणी त्यांनी पाच दशकांपूर्वी उपचार केलेल्या डॉ. दिव्य प्रभात यांनी केली.
मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नुकताच एक दुर्मीळ आणि भावनिक प्रसंग घडला. १०० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ ईएनटी (नाक, कान, घसा) सर्जन डॉ. ए. सी. जोहारी यांनी स्वतःच्या घशाच्या त्रासासाठी या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. गेली सहा दशके डॉ. जोहारी मुंबईत वैद्यकीय सेवा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले, पण या वेळी ते स्वतः रुग्ण म्हणून आले होते.
हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. जोहारी यांना घशात सतत जळजळ होत होती, काहीतरी अडकल्यासारखे वाटत होते आणि अन्न गिळताना खूप त्रास होत होता. त्यांचे वय आणि ही लक्षणे पाहता घशात काही गंभीर आजार तर नाही ना, अशी चिंता वाटणे स्वाभाविक होते. म्हणून जसलोक हॉस्पिटलच्या ईएनटी ओपीडीमध्ये त्यांची व्हिडिओ लॅरिंन्गोस्कोपी करण्यात आली.
या तपासणीत घशाच्या भागात लहान पिशवीसारखी रचना दिसली. ती सामान्य (नॉर्मल) स्थिती असून तिच्यात कोणत्याही गंभीर किंवा धोकादायक आजाराची चिन्हे आढळली नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. जोहारी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
यात आणखी एक योगायोग होता. सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉ. जोहारी यांनी डॉ. दिव्य प्रभात नावाच्या एका लहान मुलीवर सायनसची यशस्वी सर्जरी केली होती. पुढे ती मुलगी स्वतः ईएनटी सर्जन झाली आणि वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावले. आता जसलोक हॉस्पिटलच्या ईएनटी सर्जरी कन्सल्टंट असलेल्या डॉ. दिव्य प्रभात यांनीच डॉ. जोहारी यांची व्हिडिओ लॅरिंन्गोस्कोपी केली.
डॉ. दिव्य प्रभात म्हणाल्या, "डॉ. जोहारी यांच्यासारख्या अनुभवी ईएनटी सर्जनला अशी लक्षणे दिसतात, तेव्हा गंभीर आजाराची चिंता वाटणे स्वाभाविक असते. व्हिडिओ लॅरिंन्गोस्कोपीमुळे तात्काळ स्पष्टता मिळाली आणि स्थिती सामान्य असल्याचे समजताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक होते. ज्या डॉक्टरांनी ५० वर्षांपूर्वी माझ्यावर उपचार केले होते, आज त्यांच्या उपचारात मदत करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आणि विलक्षण अनुभव आहे."
डॉ. ए. सी. जोहारी म्हणाले, "माझे संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेत घालवल्यानंतर जेव्हा मला स्वतःला ही लक्षणे जाणवू लागली, तेव्हा मलाही नक्की काय घडत आहे हे जाणून घ्यायचे होते. लॅरिंन्गोस्कोपीमुळे कोणताही गंभीर आजार नसल्याची खात्री पटली. मी ५ दशकांपूर्वी ज्यांच्यावर उपचार केले होते, त्याच डॉक्टरांकडून माझी तपासणी होणे हा एक अद्भुत अनुभव होता. वैद्यकीय क्षेत्र आपल्याला अनपेक्षित मार्गाने अशा योगायोगांच्या टप्प्यावर आणून उभे करते."
हॉस्पिटलच्या माहितीनुसार, या निष्कर्षांनंतर डॉ. जोहारी यांना फक्त औषधोपचारांचा सल्ला देण्यात आला आहे. घशात जळजळ किंवा गिळण्यास त्रास ही लक्षणे नेहमी गंभीर आजाराचीच असतात असे नाही, ती सामान्य कारणांमुळेही असू शकतात, असे हॉस्पिटलचे म्हणणे आहे. वेळेवर केलेली ईएनटी तपासणी योग्य कारण शोधते आणि रुग्णाला मोठा मानसिक आधार देते, हे या घटनेतून अधोरेखित होते, असेही हॉस्पिटलने म्हटले आहे.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ जितेंद्र हरियाण म्हणाले, "आरोग्यसेवा ही विश्वासावर आधारित असते. ज्या डॉक्टरांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेत व्यतीत केले, त्यांनी त्याच प्रकारचा विश्वास आमच्या डॉक्टरांवर ठेवणे ही विशेष सन्मानाची बाब आहे. डॉ. जोहारी यांचा प्रवास त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीला एक प्रकारे पूर्णत्व देतो. डॉक्टर म्हणून आपण कितीही अनुभवी असलो, तरी रुग्ण म्हणून उपचारांमधील स्पष्टता, सहानुभूती आणि विश्वास या गोष्टींनाच आपण प्राधान्य देतो, याची आठवण हा प्रसंग करून देतो."