इम्रान खान यांच्या बहिणीला अटक, २७ सप्टेंबरच्या मार्चआधी पाकिस्तानात तणाव
इम्रान खान तुरुंगात असतानाच त्यांच्या बहिणीला लाहोरमधून अटक झाल्याने PTI च्या नियोजित लॉन्ग मार्चआधी पाकिस्तानात राजकीय तणाव वाढला आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ५ ऑगस्ट २०२३ मध्ये पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. आज जवळपास तीन वर्षं झाली तरी ते तुरुंगातच आहेत. यातल्या काही आरोपांतून ते निर्दोष सुटले आहेत, तर काही प्रकरणं अजूनही कोर्टात सुरु आहेत.
मध्यंतरी त्यांची तब्येत खालावली होती, तेव्हा त्यांच्या सुटकेची मागणी जोरात झाली होती. सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह जगभरातल्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी इम्रान खान यांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पाकिस्तान सरकारला पत्रं लिहिली होती.
याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या पक्षाने आणि पाकिस्तानी नागरिकांनी येत्या २७ सप्टेंबरला लॉन्ग मार्च काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. या मोर्च्यात इम्रान खान यांची बहीण सामील होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.
पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी PTI ने २७ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन आणि इस्लामाबादकडे लॉन्ग मार्चची घोषणा केली आहे. याच मोर्च्याआधी इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना त्यांच्या लाहोरमधल्या घरातून अटक करण्यात आली, अशी माहिती पंजाब प्रवक्त्याने दिली.
या अटकेबाबत पाकिस्तान सरकार किंवा पोलिसांकडून तातडीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अलीमा खान मोर्च्यात सहभागी झाल्या असत्या तर इम्रान खान यांना पाकिस्तानी जनतेकडून सहानभूती मिळू शकते आणि सरकारविरोधात जनतेत असंतोष वाढू शकतो, या भीतीने ही अटक केली गेली असल्याचं बोललं जात आहे.
अलीमा खान यांच्या अटकेनंतर PTI ने लगेचच निषेध जाहीर केला. पक्षाच्या पंजाब युनिटने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात असल्याचा आरोप केला आहे. लॉन्ग मार्चच्या तयारीदरम्यान याआधीही आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्याचं PTI ने सांगितलं असून हे पाकिस्तानातल्या लोकशाहीला घातक असल्याचं म्हटलं आहे.
इम्रान खान यांच्यावरील प्रकरणांमध्ये अल कदीर ट्रस्ट प्रकरण हे सर्वात मोठं आहे. या ट्रस्टमार्फत सुमारे ७ अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या जमिनींचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असून जानेवारी २०२५ मध्ये इम्रान यांना १४ वर्षांची तर पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. खान यांनी हे आरोप नाकारले आहेत.
तोषाखाना प्रकरणात पंतप्रधान असताना मिळालेल्या महागड्या सरकारी भेटवस्तूंची योग्य माहिती न देणं आणि त्या विकल्याचा आरोप आहे. २०२३ मध्ये या प्रकरणात ३ वर्षांची शिक्षा झाली होती, जी नंतर स्थगित करण्यात आली. सध्या शिक्षेविरोधात अपील प्रक्रिया सुरु आहे.
सायफर प्रकरणात अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूताने इस्लामाबादला पाठवलेल्या एका गोपनीय राजनैतिक संदेशाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. २०२४ मध्ये यात दहा वर्षांची शिक्षा झाली होती, जी नंतर रद्द करण्यात आली.
बेकायदेशीर विवाह प्रकरणात इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या २०१८ मधल्या लग्नाबाबत इस्लामिक इद्दत कालावधीचं पालन न झाल्याचा आरोप होता. यात दोघांनाही ७ वर्षांची शिक्षा झाली होती, जी नंतर रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्यात आलं.