१ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवर महिनाभर तिकीट तपासणी; मूळ ओळखपत्र नसेल तर ५०० रुपये दंड
मध्य रेल्वे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या काळात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. मोबाईलमधील फोटो, स्क्रीनशॉट किंवा झेरॉक्स चालणार नाही.
सणासुदीच्या दिवसांत गाड्यांमध्ये गर्दी वाढते आणि विनातिकीट प्रवासही वाढतो. हे थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या काळात, म्हणजे पूर्ण महिनाभर चालणार आहे.
मध्य रेल्वेच्या सर्व मार्गिकांवर, लोकल गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर ही तपासणी होणार आहे. WhatsApp किंवा स्क्रीनशॉटवरील तिकीट आता मान्य केले जाणार नाही. प्रवाशांकडे मूळ ओळखपत्र नसेल किंवा त्यांनी चुकीच्या सवलतीचा वापर केला असेल, तर ते त्यांना महागात पडू शकते.
तिकीट तपासणी कर्मचारी आता 'TTE App' वापरून प्रवाशांची तिकिटे आणि सवलती डिजिटल पद्धतीने तपासणार आहेत. सणाच्या काळातली गैरसोय टाळणे आणि फसवणुकीला आळा घालणे, हा त्यामागचा हेतू आहे. या मोहिमेत विशेषतः तीन गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. पहिली म्हणजे सवलतीची तिकिटे, म्हणजे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर सवलतींतून काढलेली तिकिटे. दुसरी म्हणजे विशेष कोटा आणि पास, म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांचे ई-पास (E-Pass), पीटीओ (PTO) आणि ग्रुप बुकिंग. तिसरी म्हणजे विनातिकीट आणि अनियमित प्रवास, त्यात चुकीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कडक नजर असेल.
कोणतीही सवलत किंवा कोटा वापरून प्रवास करत असाल, तर मूळ ओळखपत्र (Original ID Proof) सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोबाईलमधील फोटो, स्क्रीनशॉट किंवा झेरॉक्स कॉपी ग्राह्य धरली जाणार नाही.
मान्य कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड (PAN Card), पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदान ओळखपत्र (Voter ID) यांचा समावेश आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे फोटो असलेले ओळखपत्र, मान्यताप्राप्त शाळा किंवा कॉलेजचे फोटो ओळखपत्र, फोटो असलेली राष्ट्रीयीकृत बँकेची पासबुक किंवा लॅमिनेटेड क्रेडिट कार्डही चालेल. याशिवाय शासकीय नियमानुसार निर्धारित केलेले इतर मूळ ओळखपत्रही मान्य असेल.
एकाच पीएनआर (PNR) किंवा तिकिटावर अनेक जण प्रवास करत असतील, तर तिकिटावर नाव असलेल्या किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. नाहीतर त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांना विनातिकीट धरले जाईल.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट किंवा वैध प्रवासाचे कागदपत्र नसताना पकडले गेल्यास दंडाची रक्कम वाढली आहे. आता किमान ५०० रुपये दंड आकारला जाईल, आधी हा दंड २५० होता. या ५०० रुपयांसोबत प्रवासाचे नियमानुसार ठरलेले मूळ भाडेही वेगळे भरावे लागेल.
रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या ई-पास किंवा पीटीओवर प्रवास करतानाही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ट्रेनने प्रवास करताना मूळ ओळखपत्र आणि वैध तिकीट सोबत ठेवा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.