वाय प्लस सुरक्षा कशासाठी दिली, याची चौकशी व्हावी; आमदार रोहित पवारांची मागणी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राणा सूर्यवंशी यांना वाय प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले असून बारामतीतील गुन्हेगारी आणि टोरंटो प्रकल्पावरही भूमिका मांडली.
राणा सूर्यवंशी यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणातील पूर्ण वस्तुस्थिती लोकांसमोर यायला हवी आणि सुरक्षा देण्यामागची कारणे काय होती, याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. माळेगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण, बारामतीतील वाढती गुन्हेगारी आणि टोरंटो प्रकल्पाच्या जागेवरून सुरू असलेला वाद या तिन्ही विषयांवर आपली भूमिका मांडली.
हल्ला प्रकरणाच्या तपासावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सूर्यवंशी यांचे तीन मित्र अजून सापडलेले नाहीत, असा मुद्दा मांडत या प्रकरणातील संशयितांवर कारवाई का झालेली नाही, असा सवाल त्यांनी केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांच्याकडे तपासाची जबाबदारी असूनही तपास अपेक्षित वेगाने होत नाही, असा आरोप पवार यांनी केला. तपास अधिक सक्षमपणे व्हावा आणि संबंधितांची सखोल चौकशी व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली.
राणा सूर्यवंशी ज्या रुग्णालयाचे संचालक आहेत, तिथून ते नेमके कधी बाहेर पडले, याबद्दल स्पष्टता नाही, असेही पवार यांनी सांगितले. या सगळ्यामागे राजकीय किंवा व्यावसायिक फायदा मिळवण्याचा हेतू होता का, हे तपास यंत्रणांनी तपासून पाहावे, असे ते म्हणाले. बारामतीची प्रतिमा खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, नाहीतर या प्रकरणातील जबाबदार लोकांची नावे आपण जाहीर करू, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. पाच हजार रुपयांची मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.
बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. दिवंगत अजित पवार यांचा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक होता, पण सध्या लूटमार, हप्तेखोरी आणि टोळीयुद्धाच्या घटना वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांसमोरच गँगवॉरच्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांवर नियंत्रण कुणाचे आहे, असा सवाल त्यांनी विचारला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शहरात रोडरोमिओंचा त्रास वाढला असून सायंकाळी सात वाजल्यानंतर मुलींना घराबाहेर पडायला भीती वाटते, असे त्यांनी नमूद केले.
टोरंटो प्रकल्पाबाबत पवार यांनी सांगितले की, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध नाही. ज्या जागेवर तो प्रस्तावित आहे, त्या जागेबद्दल त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन सरकारने प्रकल्प दुसरीकडे हलवण्याचा पर्याय विचारात घ्यावा, असे ते म्हणाले. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहनही आमदार पवार यांनी केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.