भाजपने मलाही ऑफर दिली होती, सुशीलकुमार शिंदे यांचा खुलासा; पवारही मोदींशी बोलतात
काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर आपल्याला मिळाली होती, असे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर भाजपने आपल्यालाही दिली होती, असे त्यांनी सांगितले. मी आजही पंतप्रधानांशी बोलत असतो, शरद पवारसुद्धा पंतप्रधानांशी बोलत असतात, इतकेच नव्हे तर ते त्यांना बारामतीलाही घेऊन जातात, असे शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले.
शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा खुलासा केला. त्यांचे नातू शिखर पहारिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. त्यावर बोलताना शिंदे यांनी थेट मोदी यांचेच कौतुक केले. मोदींकडून कितीतरी चांगल्या गोष्टी होतात, काही वाईटही होतात, असे ते म्हणाले.
भाजपच्या ऑफरबद्दल शिंदे म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये आहे तर भाजपमध्ये येऊन काय करू, असा सवाल मी त्यांना केला होता. मी जिथे आहे तिथलेच काम करणार, तिकडे येऊन परत तुमच्यात ढवळाढवळ नको, असेही त्यांना सांगितले होते. देशाचे पंतप्रधान जितके माझ्याशी बोलतात, तितकेच शरद पवारांशीही बोलतात, असे ते म्हणाले. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात. त्यांना कोणी विचारत नाही, उद्घाटनाला वगैरे गेले तर काही बिघडत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले.
भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात, तेही आपण पाहिले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. आता नाही, तर २५ वर्षांपूर्वीसुद्धा असेच होत होते. सगळे एकत्रितपणे भाजपमध्ये गेले आणि चार-पाच वर्षांत परत आले, हे मी पाहिले आहे, असे ते म्हणाले. राजकारणातही चुका होत असतात, म्हणून पत्रकारांनी त्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे. नकळत कुणाकडून चूक झाली असेल तर ती समजून घेतली पाहिजे. आपली लोकशाही वर चढत जाणारी आहे, तिला काळिमा लागता कामा नये, असेही ते म्हणाले.
नातू शिखर पहारिया यांची शिंदे यांनी पाठराखण केली. पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडले, असे म्हणत त्यांनी नातवाच्या कृतीचे समर्थन केले. परवा बातमी आली की माझ्या नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले. एक दिवस असे केल्याने काय बिघडले, असा प्रश्न त्यांनी केला. मीसुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटलो. यामुळे काहीही बिघडत नाही आणि आपली विचारधारा बदलत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मध्यंतरी संघाचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, ते मी आवर्जून चाळून पाहिले, असे शिंदे म्हणाले. राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून हे सगळे महत्त्वाचे आहे. काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोलापुरात येऊन गेले, त्यांच्याविषयीही मी माहिती घेतली. त्यांचे साहित्यही मी वाचतो. कम्युनिस्ट पार्टीचा इतिहासही कितीतरी मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.