शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही, रुपाली ठोंबरे यांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना इशारा
संघाच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी हेडगेवार आणि गोळवलकर यांचे फोटो दिसल्याने रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतला.
दसऱ्यानिमित्त पुण्यासह देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. नागपूरमध्ये विजया दशमी उत्सव झाला आणि त्याला सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय इतर अनेक शहरांतही संघाच्या स्वयंसेवकांनी पथसंचलन केले.
संघाच्या या कार्यक्रमांसाठी भाजपच्या अनेक मंत्र्यांनी बॅनर लावले होते. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही असे बॅनर लावले. त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी हेडगेवार आणि गोळवलकर यांचे फोटो दिसत होते. यावर सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतला आणि बॅनरवरून थेट केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना मोठा इशारा दिला.
बॅनरवरून नाराजी व्यक्त करताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, "खासदार मुरलीधर मोहोळ यांचा मी जाहीर निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो हेडगेवार, गोळवलकर यांच्यासोबत लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. ते तुम्ही सातत्याने का करताय? महाराजांचा अवमान कराल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. भाजपच्या प्रतिनिधींना मेंदू असेल, तुम्ही शिकलेले असाल, तर जागृत होऊन शिवाजी महाराजांचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. ही काळजी घेतली नाही, तर आम्हाला वेगळ्या मार्गाने उत्तर द्यावे लागेल."
भाजपकडून राष्ट्रवादीला मिळणाऱ्या वागणुकीवरही ठोंबरे पुढे बोलल्या. त्या म्हणाल्या, "अजित पवार असल्यापासून भाजपकडून आम्हाला जी वागणूक मिळत आहे, ती काही लपून राहिलेली नाही. ही वागणूक आम्ही पक्षश्रेष्ठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना सातत्याने सांगितली आहे."
सोमेश्वर निवडणुकीचा उल्लेख करून ठोंबरे म्हणाल्या, "अजित पवार यांनी तेरा वर्षे ज्यांच्यावर विश्वास टाकून कारखाना चालवण्यासाठी दिला, तो माणूस वेगळे पॅनल तयार करतोय. त्यांना भाजप मदत करत असेल, तर या सगळ्याला सामोरे जात जनतेने त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे."
पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीबद्दल बोलतानाही त्यांनी नाराजी लपवली नाही. त्या म्हणाल्या, "पदवीधरला आम्हाला विचारात न घेता उमेदवार देत असाल आणि तो उमेदवार आमच्यावर लादत असाल, आम्हाला अशी वागणूक सातत्याने देत असाल, तर ज्यांच्यासोबत आम्ही मित्रपक्ष म्हणून बसलेलो आहोत, त्याबद्दल आजही आमच्या मनात खंत आहे."
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.