शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपे यांचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्मात्या आणि लेखिका सई परांजपे यांनी तब्येतीचे कारण देत शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार कळवला आहे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि लेखिका सई परांजपे यांनी नकार दिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून त्यांना या अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आली होती. परिषदेकडून त्यांना तशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपला नकार परिषदेला कळवला आहे.
परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी सई परांजपे यांच्याशी संपर्क साधला होता. ऐतिहासिक ठरणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे, अशी विनंती महाजन यांनी केली होती. त्यावर परांजपे यांनी महाजन यांना स्पष्टपणे नकार कळवला.
नकाराचे कारण काय, असा प्रश्न साहजिकच पुढे आला. परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सई परांजपे यांनी नकारासाठी आपल्या तब्येतीचे कारण दिले आहे.
सई परांजपे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार, अशा चर्चांना आधी उधाण आले होते. आता त्यांनी नकार दिल्यामुळे अध्यक्षपदी कोण येणार, हा प्रश्न कायम राहिला आहे.
यंदाचे साहित्य संमेलन शंभरावे असल्यामुळे ते नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे. सुनील महाजन यांच्याकडून सई परांजपे यांना विचारणा झाली होती, पण त्यांनी नकार कळवला. अशा वेळी अध्यक्षपदाचा मान कोणाला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पुन्हा एकदा आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असेल, हे ठरवले जाणार आहे. परांजपे यांनी नकार कळवल्यामुळे आता शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सई परांजपे या सिनेसृष्टीतील दिग्गज नाव आहे. आपल्या समांतर सिनेमांनी त्यांनी प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणले. कित्येक दर्जेदार सिनेमे देणाऱ्या परांजपे उत्तम दिग्दर्शक आणि निर्मात्या असण्यासोबतच लेखिकाही आहेत.
त्या मराठी लेखिका, नाटककार आणि पटकथाकार आहेत. बालनाट्य लिहून ते रंगमंचावर सादर करणाऱ्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक दर्जेदार बालनाट्येही लिहिली आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.