सासवडच्या माजी प्राचार्यांचे नाव १७ किमीवरील राजेवाडी केंद्रावर, पदवीधर मतदार याद्यांत घोळ
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार याद्यांतील त्रुटींमुळे सासवडमधील मतदारांना दूरच्या गावातील केंद्रावर पाठवल्याची तक्रार संजय मेहेत्रे यांनी केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये अनेक गंभीर त्रुटी असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. सासवडमध्ये राहणारे संजय मेहेत्रे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार त्याचं उदाहरण ठरला आहे.
मेहेत्रे हे पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते त्यांच्या मूळ गावी, म्हणजे सासवडमध्ये स्थायिक झाले. गेल्या आठ वर्षांपासून ते तिथेच राहत आहेत. पदवीधर निवडणुकीत आपलं मत सासवड शहरातच टाकता येईल, अशी त्यांना अपेक्षा होती.
मेहेत्रे आणि त्यांच्या पत्नीने पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदवलं होतं. प्राथमिक यादी आली, तेव्हा त्यांचं नाव सासवड केंद्रावरच होतं आणि त्यांचा अनुक्रमांक ८४८ असा होता. पण ऐनवेळी अंतिम यादी आली, तेव्हा त्यांचं नाव सासवडपासून १६ ते १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेवाडी गावातील मतदान केंद्रावर गेलेलं दिसलं.
हे लक्षात आल्यावर मेहेत्रे यांनी सासवडमधील निवडणूक शाखेतील नायब तहसीलदारांकडे धाव घेतली. मात्र दोन दिवस त्यांना भेटच मिळाली नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलूनही पुरेशी मदत मिळाली नाही, म्हणून ते थेट तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे गेले. तहसीलदारांनी आता प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, असं सांगून हात झटकले. एवढंच नव्हे, तर मतदान केंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय करू, असं अजब आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
मेहेत्रे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न एकट्याचा नाही. सासवडच्या प्राथमिक यादीत असलेली सुमारे १०० ते २०० नावं ऐनवेळी दूरच्या गावांमध्ये हलवण्यात आली आहेत. ते म्हणाले की, यादी पाहिली तर खूप नावं दिसतात. पहिल्या यादीत सासवडला असलेली नावं शिफ्ट होऊन तिकडे गेली आहेत. मतदान कोणाला द्यायचं हा आमचा अधिकार आहे, पण आम्हाला त्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि याबाबत अधिकारी उत्तर देत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.
एका बूथवर मतदार जास्त झाले असतील, तर स्थानिक पातळीवर नवीन बूथ वाढवणं अपेक्षित होतं. त्याऐवजी थेट नावं दुसऱ्या गावात ढकलणं चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, "आम्हाला कोणाच्या उपकाराची किंवा नेण्याआणण्याच्या सोयीची गरज नाही. आमचा मतदानाचा अधिकार हा आमचा हक्क आहे. सासवडमध्ये सहजपणे नवीन बूथ वाढवता आले असते, पण प्रशासनाने जाणीवपूर्वक हा गलथान कारभार केला आहे."
अशा मनमानी कारभारामुळे आणि लांब अंतरामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे मतदानाच्या टक्क्यावरही मोठा परिणाम होईल, अशी भीती मेहेत्रे यांनी व्यक्त केली. एका निवृत्त प्राचार्यांना मतदान करताना अशा अडचणींना तोंड द्यावं लागत असेल, तर सामान्य नागरिकांचं काय, असा गंभीर सवाल यातून उभा राहिला आहे.
या प्रकरणी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना अनेकदा फोन करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.